बालमधुमेहींच्या गरजा पूर्ततेसाठी राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्य : मंत्री राजेश टोपे

औरंगाबाद : बालमधुमेहींकरिता गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत ‘उडान’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने बाल मधुमेही आणि त्यांच्या पालकांकरिता अत्यंत उपयुक्त, परिपूर्ण अशा ‘ड से डायबेटीस’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. बाल मधुमेह आणि त्यांचे पालक पालक यांना यासंदर्भात माध्यमातून सर्वांगीण मार्गदर्शन मिळणार आहे.

मराठी भाषेतील अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असून, यांच्यातील विविध चार्ट आणि मार्गदर्शनामुळे बाल मधुमेही आणि त्याचे पालक यांना खूप फायदा होणार असल्याचे या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अर्चना सारडा यांनी सांगितले. अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे या बाळ रुग्णांना शक्य होत नाही. अशावेळी या पुस्तकातील अत्यंत नेमक्या सूचनांचे पालन करून आणीबाणीचे प्रसंग टाळता येऊ शकतील, असे त्या म्हणाल्या. कार्टून, डेली चार्ट लॉग बुक आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून यात अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. एज्युकेटर पूजा दुसाद या पुस्तकाच्या सहलेखिका असून, याचे डिझाईन वृषाली देशमुख आणि गायत्री शाह यांनी तयार केले आहे.

पुस्तक प्रकाशन प्रसंगी मंत्री राजेश टोपे यांनी उडानचे या उपक्रमाबद्दल कौतुक करून टाईप वन डायबेटीस झालेल्या मुलांच्या गरजांविषयी माहिती घेतली. बाल मधुमेहींसाठी इन्सुलिन, ग्लुकोमीटर आणि त्याच्या स्ट्रीप अत्यंत आवश्यक असतात. त्यांची वेळेवर उपलब्धता झाली नाही तर या मुलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि शासकीय रुग्णालयांतून हे उपलब्ध होत नसल्याची माहिती डॉ. सारडा यांनी दिली. यावर मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करून ते शासकीय रुग्णालयांतून उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या पुस्तक प्रकाशनावेळी लेखिका डॉ. अर्चना सारडा, एज्युकेटर पूजा दुसाद, डॉ. संपत सारडा, ऍड. संभाजी टोपे, सानिका वानखेडे आदी उपस्थित होते.

बाल मधुमेहींसाठी कार्यरत ‘उडान’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मराठवाडाभरातील सातशेपेक्षा जास्त गरीब बाल मधुमेहींना निदान, उपचार, मार्गदर्शन तसेच त्यांच्याकरिता दररोज अत्यंत आवश्यक इन्सुलिन आणि ग्लुकोमीटर तसेच स्ट्रीप संपूर्णपणे मोफत पुरविले जाते.