मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पुढील ५ दिवस हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain In Marathwada) होत आहे.

    औरंगाबाद: आज दुपारी पुन्हा एकदा पावसाला(Heavy Rain) सुरुवात झाली. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain In Marathwada) होत आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही भागातच मुसळधार पाऊस झाला. मात्र आता पुन्हा एकदा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने मराठवाड्यातील (Marathwada Rain Forecast) सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

    आज भर दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरण अंधारून आलं. आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. औरंगाबाद शहरासह, वाळूज, पाचोड, खुलताबाद, कन्नड आदी भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नवरात्रीच्या तयारीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली. उद्यापासून सुरु होणाऱ्या नवरात्रीसाठी शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या.मात्र अचानक सुरु झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले.

    अलर्ट

    औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा अन् वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

    तसेच ८ ऑक्टोबरला औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून जोरदार पावसाची तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे. याशिवाय ९ आणि १० ऑक्टोबरलाही महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.