मराठवाड्यात बीड-जालन्याला पावसाने चांगलेच झोडपले, येत्या 2 दिवसात मराठवाड्यात कसा असेल पाऊस? : जाणून घ्या

महाराष्ट्रासह मराठवाडा आणि परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

  औरंगाबाद : महाराष्ट्रासह मराठवाडा आणि परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे सर्वाधिक 148 मिलीलीटर पावसाची नोंद झाली.

  दरम्यान येत्या दोन दिवसातही औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, नगर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यासह विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

  बीड-जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस

  मराठवाड्यातील बीड आणि जालन्याला रविवारी पावसाने चांगलेच झोडपले. जालना, परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले. नद्यांना पूर आल्याने प्रवाह बदलून पाणी शेतात शिरल्याने शेतजमिनी खरडून गेल्या. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात धोंडराई पुलावर पाणी आल्याने 9 तास वाहतूक ठप्प होती. अनेक गावांचा संपर्कही तुटला होता.

  तर उस्मानाबाद जिल्ह्यात नळदूर्ग येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरण 100 टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पावसामुळे उस्मनाबादेतील नर-मादी धबधबा वाहू लागला आहे. शनिवारी आणि रविवारच्या पावसाने मराठवाड्यातील 85 मंडळांमध्ये अतिवृष्टीचा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा चिखल पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

  कसे असेल शहराचे हवामान?

  शहरातील एमजीएम संस्थेतील वेधशाळेच्या नोंदणीनुसार, आज सोमवारी 6 सप्टेंबर रोजी शहराचे तापमान 26 अंश सेल्सियसचत्या आसपास आहे. शहरात आज पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. काल रविवारी 5 सप्टेंबर रोजीदेखील शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी शहराला पावसाने चांगलेच झोडपले. शहरातील आर्द्रतेचे प्रमाण 79% असून वाऱ्याचा वेग ताशी 10 किलोमीटर एवढा आहे. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता चांगली अर्थात आरोग्यदायी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

  मराठवाड्यात येत्या 2 दिवसात कसा असेल पाऊस?

  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 6,7 सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 8 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

  बंगालच्या उपसागरावर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस सुरु आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भावर जास्त परिणाम दिसून येतात. 10 ते 16 सप्टेंबरपर्यंत या कालावधीत मात्र राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान कोकण आणि विदर्भात पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहील, मात्र मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, मराठवाडा आणि प. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.