वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत शासन नियमानुसार नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही यांनी दिली.

औरंगाबाद : मुरमा येथे एकनाथ मानमोडे, सोनाजी लेंभे यांच्या शेतात जाऊन कापसाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी देशमुख यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीसह धान्य वितरण, अनुदान आदींबाबत समस्या मांडल्या. त्या समस्या तत्काळ सोडवू, काळजी करू नका, अशी ग्वाही देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे संतोष मोरे यांच्या द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासन योग्य ती नियमानुसार मदत करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी पीक नुकसानीबाबत, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री देशमुख यांना सविस्तर माहिती दिली.

या पाहणी दरम्यान देशमुख यांच्या समवेत कल्याण काळे, अनिल पटेल,  मुरुमाचे सरपंच एकनाथ फटांगडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, किशोर देशमुख आदींसह महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती होती.