aurungabad jain sangh program

औरंगाबादः सात महिन्यांपूर्वी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा सर्वजण अनभिज्ञ होते. आता काही प्रमाणात का होईना उपचार, सुविधा आणि तपासण्यांच्या बाबतीत आपण एक पाऊल पुढे नक्कीच गेलेलो आहोत. मात्र हे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय सुविधा वाढविण्यासह रुग्णांमधील गैरसमज व भिती दूर करण्याची आवश्कता आहे, असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा(shantilal mutha) यांनी ‘कोरोनासे दो हाथ’ या लोकसहभाग मोहीमेची(coronase do hath movement) माहिती देताना आज सिडकोतील अग्रसेन भवन येथे व्यक्त केले.

यावेळी आयोजित चर्चासत्रात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, ऍड. गौतम संचेती, जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी, सुहिता शेंडे, प्रवीण पारख, पारस चोरडिया, अनिल संचेती, अमित काला,राहुल दाशरथे आणि अभिजीत हिरप यांची उपस्थिती होती.
यावेळी ब्राह्मण, सिंधी, मराठा, खंडेलवाल, पाटीदार, अग्रवाल, माहेश्वरी,गुजराती आणि मुस्लिम समाजांतील प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती होती.

मुथा म्हणाले की, आजघडीला आकडेवारीप्रमाणे जास्तीत जास्त अर्धा टक्के लोकांना कोरोना झालाय किंवा होऊन गेलाय. याचाच अर्थ आतापर्यंत ९९ टक्के लोकांना कोरोना झालेला नाही. कोरोना न पसरण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत लॉकडाऊन होता. आताही लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटविला जातोय. लॉकडाऊन जसजसा कमी होत जाईल तसतसा कोरोना आपले हातपाय पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन दरम्यान उपचार, सुविधा आणि तपासण्यांत बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत. आता त्यावर थांबून भागणार नाही, एक पाऊल पुढे जाऊन तजवीज करावी लागणार आहे.

कोरोना आजारापेक्षा याबाबत असलेली भीती जास्त घातक ठरत आहे. गैरसमजातून आजही दहापैकी पाच जण चाचणी करायला तयार होत नाहीत. पण या आजाराचे धोके टाळायचे असतील त्याचे लवकर निदान गरजेचे आहे.गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कोरोनासह आणखी वर्षभर राहावे लागणार आहे. यादरम्यान वैद्यकीय सुविधा वाढवण्याची गरज असून विविध समाजांनी पुढाकार घेऊन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आवाहन मुथा यांनी यावेळी केले. तसेच ऑक्सिजन पुरवण्यासह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शांतीलाल मुथा यांनी शहरातील तीन कोविड केअर सेंटरला भेट देवून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी भारतीय जैन संघटनेच्या कामाचे कौतुक केले. जून महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मोठी होती. पण महापालिकेने वेळीच घेतलेली खबरदारी आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यामूळे रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ शकली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, भूकंप, दुष्काळ अशा अनेक कठीण प्रसंगात भारतीय जैन संघटनेने सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे.कोरोनाच्या या संकटात संघटनेचे कार्य महत्वाचे आहे.कोरोना से दो हाथ, आमची माती, आमची माणसं, आमची जबाबदारी या मोहिमातून लोकसहभाग भारतीय जैन संघटनेमुळे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. भारतीय जैन संघटनेच्यावतीने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच आरोग्य अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त जिल्हा समितीची निवड करण्यात येऊन प्रतिनिधींना शपथही देण्यात आली.

यावेळी अग्रवाल समाजाचे रमेश अग्रवाल, माहेश्वरी युवा मंडळाचे बजरंग नावंदर , ब्राम्हण समाज समन्वय समितीचे मिलिंद दामोधरे, अभिषेक कादी, एशियन हॉस्पिटलचे डॉ. हाश्मी, मराठा समाज – गणेश जाधव, खंडेलवाल दिगंबर पंचायत संजय कासलीवाल, पाटीदार समाज – गोपाल भाई पटेल , गुजराती समाज – लाला भाई पारीख, तसेच सिल्लोडहून अमोल ठाकरे, शिऊर – पवन चुडीवाल, विजय बनकर, कन्नड- प्रशांत जालनापुरकर उपस्थित होते. पारस बागरेचा यांनी सूत्रसंचालन केले.प्रकाश कोचेटा यांनी आभार मानले.