aurangabad murder

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौका शिवारात राधे गोविंद सेवा मिशन या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून हा आश्रम चालू आहे. राधा गोविंद सेवा आश्रमात येणारा मोठा भक्त गण आहे. या ठिकाणी महाराजांबरोबर त्यांचे साधकही कायम वास्तव्यास आहेत.

औरंगाबाद. औरंगाबाद तालुक्यातील चौका शिवारात असलेल्या राधा गोविंद सेवा मिशन येथील महाराजांवर पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी आश्रमात घुसून महाराज व त्यांच्या साधकांना गंभीर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रियशरण ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर महाराज हे या घटनेत जखमी झाले आहेत.

मध्यरात्री हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौका शिवारात राधे गोविंद सेवा मिशन या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून हा आश्रम चालू आहे. राधा गोविंद सेवा आश्रमात येणारा मोठा भक्त गण आहे. या ठिकाणी महाराजांबरोबर त्यांचे साधकही कायम वास्तव्यास आहेत. या ठिकाणी असलेल्या प्रियशरण महाराज व त्यांचे साधक रात्री झोपलेले असताना बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात सात हल्लेखोरांनी त्यांच्या सेवा आश्रमाच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. काही न बोलता महाराज व त्यांच्या साधकांना मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला.

तपास सुरू

पोलिस निरीक्षक अशोक मुगदीराज, पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर बुधवारी सकाळी श्वान पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु कुठलाही माग निघाला नाही. सदर महाराजांना जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घेतलेल्या जबाबाच्या आधारे प्रियशरण महाराजांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुगदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे, बीट जमादार विजय पाखरे करीत आहेत.