open school

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनावर निर्णय सोपवला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात मागील तीन दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शाळा बंदीचे आदेश न काढता विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे.

औरंगाबाद (Aurangabad). राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनावर निर्णय सोपवला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात मागील तीन दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शाळा बंदीचे आदेश न काढता विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे.

आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त, औरंगाबाद

राज्य सरकारच्या आदेशानुसार औरंगाबाद शहरात शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली. सरकारी तसेच खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या केंद्रनिहाय बैठका घेऊन पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांतील वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करून घेण्यावर मागील तीन दिवसांपासून भर दिला. तसेच शहरातील शिक्षकांची कोरोना चाचणी देखील सुरू केली. दोन दिवसांत दोन हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे; मात्र मागील तीन दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे.

तीनच दिवसांत ४०४ रूग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळेच शाळा सुरू करायच्या की नही, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. दरम्यान, शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्राला महागात पडेल, असा सूचक इशारा दिला. त्यामुळे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. यावर औरंगाबाद शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांना शुक्रवारीच विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी शनिवारी दि. २१ निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यावर शनिवारी आयुक्‍त पांडेय यांनी आदेश जारी केले. या आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळेत गैरहजर राहण्यास मुभा दिली आहे.

शिक्षक मात्र शाळेत येणार
औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. आता आयुक्‍त पांडेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून ऑनलाइन शिकवणी देखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पुणे, मुंबईत शाळा बंदचा निर्णय
शिक्षणमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनावर निर्णय सोपवल्यानंतर राज्यातील पुणे व मुंबई या महानगरांनी माध्यमिकच्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र औरंगाबाद शहरात पालिका प्रशासनाने केवळ विद्यार्थ्यांना ३
जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे.