marathwada factory

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गाळप हंगाम लांबला असला तरी या वर्षी मराठवाड्यातील ५४ साखर कारखान्यांतून शंभर लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. या वर्षी औरंगाबाद विभागात साधारणत: एक लाख ४२ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. या वर्षी साखरेचे दर कमी राहतील असे लक्षात आल्यानंतर इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील असा अंदाज असून जय भवानी साखर कारखाना आणि श्रद्धा साखर कारखान्याकडे नऊ कोटी रुपयांची शेतकऱ्यांची देणी शिल्लक असून गाळप परवाना (threshing is expected in Marathwada) मागितलेल्या २२ पैकी १२ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. मराठवाड्यात आतापर्ऱ्यत सर्वाधिक एक हजार ११० लाख लिटर अल्कोहोल उत्पादन केले जात होते. त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात गेल्या दहा वर्षांत ऊस गाळप क्षमता एक लाख ५७ हजार ५० मेट्रिक टन प्रतिदिन एवढी झाली आहे. अतिवृष्टीमुळे ऊस तोडणी करणे शक्य नसल्याने नोव्हेंबरमध्ये साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील. त्यातच ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचा संपही अजून सुरूच आहे. गावातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांना अडवले जात आहे. बीड जिल्ह्य़ात अलीकडेच मजुरांची एक मालमोटारही जाळण्याचा प्रकार घडला. ऊसतोडीचे करार पूर्ण झाल्याशिवाय मजूरांनी कोयता हाती धरू नये, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे तातडीने तोडणी आणि त्याच्या मोळ्या बांधून वाहतूक करणे शक्य होणार नाही.

मालमोटार किंवा ट्रॅक्टरवर ऊस भरणे आणि त्याची वाहतूक शक्य होणार नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांचे गाळप सुरू होऊ शकेल. गेल्या दहा वर्षांत मराठवाड्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता ६६ टक्क्यांनी वाढली आहे. २००० ते २०१९ या कालावधीमध्ये ९४ हजार ५५० मेट्रिक प्रतिदिन असणारी गाळप क्षमता आता एक लाख ५७ हजार मेट्रिक टन प्रतिदिन एवढी आहे. त्यामुळे गाळपाचा हंगाम १६० दिवसांचा धरला तरी फेब्रुवारीपर्यंत हंगाम सुरू राहील, असा अंदाज आहे.

राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांना मिळणारा ऊसतोड मजूर बीड जिल्ह्य़ातील असल्याने तोडणीचे दर निश्चित करणे अनिवार्य असल्याचा नेत्यांचा आग्रह आहे. या वर्षी तोडणी मजुराच्या संघटनेचे नेते कोण यावरूनही बराच गदारोळ सुरू आहे. पंकजा मुंडे साखर कारखानदारांच्या रांगेत बसतात त्यामुळे त्या करत असलेले नेतृत्व नाकारा असा प्रचार पद्धतशीरपणे केला जात आहे. त्याला भाजपमधील गटाबाजीनेही प्रोत्साहन दिले असून सुरेश धस आणि विनायक मेटे यांनीही ऊसतोड मजुरांचे मेळावे घेतले. अतिवृष्टीमुळे ऊसतोडणी मजुरांचा करारही लांबणीवर पडल्याचे भाजप नेत्यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.

पाणी दिसले की टपरं लागणारच

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊस आणि मराठवाडा यावर पुन्हा भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘आता पाणी दिसलं की टिपरं लागणारच. लिहिणारे ऊस पीक घेऊ नका असे म्हणतात. पण लोक ऊस लावणारच. या वर्षीपेक्षाही तो पुढील गळीत हंगामात अधिक असेल. त्यामुळे त्याची आतापासून तयारी असावी. उसाला अधिक पाणी लागते हे गणित बदलण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटने जमीन घेतली असून त्यात कमी पाण्यात ऊस उत्पादनाचे प्रयोग हाती घेतले जातील.’’

मराठवाड्यातील वाढते कारखाने

* २०१०-११ मध्ये ४६ कारखाने होते, ते आता २०१८-१९ पर्यंत ५४ साखर कारखाने आहेत.
* २०१०-११मध्ये साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन ९४ हजार ५५० मेट्रिक टन होती ती आता एक लाख ५७ हजार आहे.
* दहा वर्षांत साखर उत्पादन १४ लाख ५३ हजार मेट्रिक टन होते, ते आता २० लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे.
अशी वाढत गेली ऊसलागवड (आकडे लाखांमध्ये)
वर्ष आकडे
२००९-१० १.८५
२०१०-११ २.१२
२०१२-१३ २.४०
२०१४-१५ २.१६
२०१५-१६ २.४१
२०१६- १७ ०.९३
२०१७-१८ २.१४
२०१८- १९ ३.१३