जनतेने अधिक सतर्कता बाळगावी- प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

केरळसह, राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासोबतच कोरोना संसर्ग वेळीच रोखण्याच्या दृष्टीने जनतेने अधिक खबरदारीपुर्वक मास्कसह सर्व प्रतिबंधात्मक नियमांची सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे केले.

  •  संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मुलीचे लग्न घरगुती पद्धतीने करण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय
  • कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणार
  • मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतराचे पालन बंधनकारक

औरंगाबाद. केरळसह, राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासोबतच कोरोना संसर्ग वेळीच रोखण्याच्या दृष्टीने जनतेने अधिक खबरदारीपुर्वक मास्कसह सर्व प्रतिबंधात्मक नियमांची सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबतच्या पत्रकार परिषदेचे आयोजन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर उपस्थित होत्या.

डॉ. अनंत गव्हाणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच विभागीय आयुक्तांव्दारे निर्देशित करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे तातडीने पालन करण्यात येत असून प्रशासनातर्फे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनीही यात सक्रीय सहभाग घेऊन स्वत:सह शहराच्या जीवीताच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे अधिक काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तसेच वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून सर्दी, ताप, खोकला या कोविड सदृश्य लक्षणांच्या रूग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्याबाबत सूचित करण्याचे खासगी डॉक्टरांना निर्देशित केले आहे. त्याचप्रमाणे लग्नसमारंभ, इतर कार्यक्रमामध्ये मास्क वापर, सॅनिटायजर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करण्याबाबत खबरदारी घेण्याचे मंगलकार्यालय चालकांना तसेच कोचिंग क्लासेस संचालकांना निर्देशित केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक कार्यवाही देखिल केली जाणार असल्याचे डॉ. गव्हाणे यावेळी म्हणाले.

कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून ९९ हजार ७६३ खाटा, ५३२ आयसीयु, ३०० व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या आपत्तीसोबत नागरिकांच्या सोबतीने प्रशासन लढा देत असून गेल्या महिनाभरापर्यंत जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार २३५ रूग्ण बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३७ टक्के आहे. तर मृत्यूदर २.६० टक्के इतका आहे. मात्र गेल्या आठवडा भरापासून नवीन रूग्ण वाढीचे प्रमाण वाढते असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करत सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. तसेच जिल्ह्यात लसीकरणालाही सुरवात झाली असून ४१.५४ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले असून १६ मार्च नंतर पन्नाशीच्या पुढच्या लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.