Racket of beggars in Aurangabad: दीड लाखात दोन मुलांचा सौदा; आई-वडीलांनी 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर केला पोरांचा व्यवहार

महिला आरोपी सविता पगारे हिने 5 वर्षीय मुलाला बुलडाणा जिल्ह्यातून आई-वडिलांकडून 55 हजार रुपयांत विकत घेतले तर दुसऱ्या 2 वर्षीय मुलाला जालना जिल्ह्यातून 1 लाख रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतल्याचे सांगितले. दोन्ही मुलांची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

    औरंगाबाद : औरंगाबादेत भिकाऱ्यांच्या नव्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आई-वडील आणि नातवाईकांनीच या भिकाऱ्यांच्या टोळीला दोन मुले विकली. भिकाऱ्यांच्या टोळीने दीड लाखात 2 मुलांची खरेदी केली. हा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. या प्रकरणातील महिला आरोपींनी आम्ही ही मुले दत्तक घेतल्याचा दावा केला. यासाठी 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार झाल्याचेही त्यांनी सांगितले.

    मात्र संपूर्ण तपासाअंती मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला आरोपी सविता पगारे हिने 5 वर्षीय मुलाला बुलडाणा जिल्ह्यातून आई-वडिलांकडून 55 हजार रुपयांत विकत घेतले तर दुसऱ्या 2 वर्षीय मुलाला जालना जिल्ह्यातून 1 लाख रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतल्याचे सांगितले. दोन्ही मुलांची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

    मुकुंदवाडी परिसरातील रामनगर येथील रहिवासी कांताबाई खंडागळे यांनी, जनाबाई उत्तम जाधव ही महिला तिच्या घरात असलेल्या लहान मुलांचा अमानुषपणे छळ करत असल्याचे वारंवार पाहिले होते. त्यांनी समाजसेवक देवराज वीर यांना फोन करून जनाबाई लहान मुलास क्रूरपणे मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर वीर घटनास्थळी पोहोचले. तेव्हा जनाबाई आणि तिची मुलगी सविता संतोष पगारे या दोघी एका मुलाला लाकडी पट्टी आणि हाताने मारत होत्या. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रकार पाहून वीर यांनी पाच वर्षाच्या मुलास त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर वीर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या दोन महिला आणि मुलांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले.

    या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. तेव्हा ही मुले बोलती झाली. मला भीक मागण्यासाठी येथे आणले असून तसे नाही केले तर खूप भयंकर शिक्षा केली जाते, असे एका मुलाने सांगितले. त्यांचे ऐकले नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण, बाथरुममध्ये झोपायला लावणे, तासन् तास पाण्यात बसवून ठेवले जात होते, असे दोन्ही मुलांनी सांगितले.