‘त्या’ वक्तव्यावर माफी मागणार का?’ हा मुद्दा पत्रकारांनी रेटून धरला, दानवेंनी पत्रकार परिषदेतूनच पळ काढला

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(raosaheb danve) यांनी शेतकरी आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्‍तव्य केल्याने शेतकरी आंदोलन पेटले आहे, असे म्हटले होते. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली जात असतानाच आज औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दानवे यांनी माफी मागण्याऐवजी आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास केला गेल्याचा आरोप केला.

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(raosaheb danve) यांनी शेतकरी आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्‍तव्य केल्याने शेतकरी आंदोलन पेटले आहे, असे म्हटले होते. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली जात असतानाच आज औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दानवे यांनी माफी मागण्याऐवजी आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास केला गेल्याचा आरोप केला. मात्र माफी मागणार का, हा प्रश्‍न प्रसारमाध्यमांनी रेटून धरल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून(raosaheb danve left the press conference) पळ काढला.

केंद्रातील भाजप सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर करत ती अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून शेतकरी आंदोलन राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त वक्‍तव्य केले. त्यांच्या या वक्‍तव्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. औरंगाबाद येथे तर प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर येथील जलकुंभावर ठिय्या आंदोलन करत जोपर्यंत दानवे शेतकर्‍यांची माफी मागणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा हट्ट धरला होता. तीन दिवस चाललेल्या या आंदोलनात पोलिसांनी गुन्हे दाखल करत ते मोडीत काढले. या पार्श्‍वभूमीवरच मंगळवारी केंद्रीय मंत्री दानवे यांनी केद्र सरकारने मंजूर केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकर्‍यांसाठी कसे फायदेशीर आहेत, हे सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

यावेळी दानवे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी केलेल्या वक्‍तव्याबद्दल माफी मागणार का, असा प्रश्‍न छेडला. त्यावेळी दानवे म्हणाले की, मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरही शेतकरीच आहे. खरे तर शेतकर्‍याची विडंबना कुणीही करू नये. मात्र माझ्या वक्‍तव्याचा विपर्यास केला गेला. मी शेतकरी असताना शेतकर्‍यांचा अपमान करू शकतो का? असे म्हणत दानवे यांनी पत्रपरिषद गुंडाळली. आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास कसा केला गेला, याचा खुलासा माध्यमांनी तयांना विचारला. तेव्हा त्यांनी काढता पाय घेत तेथून पळ काढला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी नगरसेवक प्रमोद राठोड आदींची उपस्थिती होती.

कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचेच : कृषी कायदे लोकसभा व राज्यसभेत चर्चा सुरू असताना विरोधकांनी त्यास कुठलाही विरोध केला नाही. मात्र मतदान घेताना गोंधळ करत सभागृहाच्या अध्यक्षांवर त्याच्या पत्रिकाही फेकल्या. हे कायदे मंजूर केल्यानंतर महिनाभर कुठलाही विरोध त्यास झाला नाही. आता पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विरोधक वातावरण तापवण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.