खासदार इम्तियाज जलील यांनी प्रलंबित रस्त्याच्या स्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना नवीन तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा बाबत योग्य त्या सूचना दिल्या.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रलंबित रस्त्याच्या स्थळाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना नवीन तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा बाबत योग्य त्या सूचना दिल्या.

  • एमआयडीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती

औरंगाबाद (Aurangabad) :  शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा–प्रिया मार्केट बारुदगरनाला–सिटी चौक या मुख्य रस्त्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामाला एमआयडीसी मार्फत सुरुवात होणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आज सदरील रस्त्याची स्थळ पाहणी करुन उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नवीन तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याची गुणवत्ता व दर्जा बाबत योग्य त्या सूचना दिल्या.

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ते तयार करण्यासाठी शासनाने १५० कोटीच्या विशेष निधीची तरतुद करुन त्यास मान्यता दिली होती. सदरील निधीतुन शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रिटिकरण करण्यात येणार आहे. नागरीकांना चांगले व दर्जेदार रस्ते मिळावे म्हणुन सदरील निधीतुन करण्यात येणारे रस्त्यांचे कामे महानगरपालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी या तीन विभागाकडून करण्यात येणार आहे. १५० कोटीतुन एमआयडीसी विभागाकडे ५० कोटी निधी वर्ग करण्यात आला असुन त्या निधीतुन सदरील सिमेंट क्राँक्रिट रस्त्याचे कामाला सुरुवात होणार आहे.

रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यापूर्वी मार्किंग करण्यात येणार आहे. मार्किंग केल्यानंतर रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण महानगरपालिका, एमआयडीसी व पोलीस विभागातर्फे काढण्यात येणार असुन त्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले. तसेच पाहणी दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले की, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ दिवसात पाऊस थांबणार असुन त्यानंतर अडथळा निर्माण करणारे विद्युत पोल व वाहिन्या महावितरण कडून हटविण्याचे कामास सुरुवात होणार आहे.

रस्त्यांच्या दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथक तयार करणार – खासदार इम्तियाज जलील
१५० कोटी निधीतुन तयार करण्यात येणारे सर्व नविन सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांचे कामांची गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. विशेष पथकाने पाहणी करुन रस्त्याच्या कामाबाबत दिलेल्या अहवालात शहरातील कोणत्याही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास, संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करुन निधीची वसुली करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.