शहरातील ०९ झोनमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू होणार- आस्तिक कुमार पांडेय

प्रकल्पाअंतर्गत महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक युवती व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नौकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

    औरंगाबाद (Aurangabad): महानगरपालिका(Aurangabad Municipal Corporation) , स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Smart City Development Corporation) आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन (Light House Communities Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ०९ झोनमध्ये लाईट हाऊस (कौशल्य विकास केंद्र ) सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.

    आज ३१ ऑगस्ट रोजी प्रशासक यांच्या दालनात मनपा ,स्मार्ट सिटी आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक ,युवती विद्यार्थ्यांना कौशल्य विकास साधण्यासाठी प्रशिक्षण देण्याहेतू औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लाइट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांचेमध्ये दि 15 फेब्रुवारी 2021 रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या समोर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.

    या प्रकल्पाअंतर्गत महानगर पालिका क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित वस्त्यांमधील युवक युवती व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच संबंधित अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नौकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे . दि 16 मार्च 2021 पासून सहा कोर्सेस सुरू झाले आहेत. यातील 12 विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक क्षेत्रात नौकरी उपलब्ध झाली आहे.आज पर्यंत 200 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून संबंधित कोर्सेस च्या निगडित शहरातील विविध ठिकाणी कोविड नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे .

    या प्रकल्पाला स्टरलाईट टेक्नॉलॉजीस यांचे अर्थ साहाय्य लाभले आहे. या बैठकीत उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या संचालक मती रूची माथूर, प्रतिनिधी अतुल माने ,समीर शेख, स्मार्ट सिटीच्या सहायक प्रकल्प अधिकारी स्नेहा नायर ,स्नेहा बक्षी,आदींची उपस्थिती होती.