रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बेवारस, भंगार वाहनावर कारवाई करा; मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय

रस्त्याच्या कडेला बेवारस, भंगार वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर २ ऑगस्ट पासून महिनाभर कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे. सदरील वाहनावर सात दिवसांची नोटीस लावून सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगरपालिकेकडून वाहने जप्त करावे.

    औरंगाबाद (Aurangabad). रस्त्याच्या कडेला बेवारस, भंगार वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर २ ऑगस्ट पासून महिनाभर कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे. सदरील वाहनावर सात दिवसांची नोटीस लावून सात दिवसानंतर वाहने उचलली नाही तर महानगरपालिकेकडून वाहने जप्त करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज शुक्रवारी दिले.

    महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या दालनात आज शुक्रवारी रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस व भंगार वाहने जप्त करण्याबाबत महानगरपालिका, आरटीओ, पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त बी.बी .नेमाने, रविंद्र निकम, कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुरेश वानखेडे, सहाय्यक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, मनपा कार्यकारी अभियंता रस्ते बी .डी .फड, कार्यकारी अभियंता वाहने डी. के. पंडित, महानगरपालिकेचे सर्व वार्ड अधिकारी व वार्ड अभियंता ,पद निर्देशित अधिकारी व अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, रस्त्याच्या कडेला बेवारस व भंगार वाहने उभे करून वाहतुकीस तसेच साफसफाई कामात अडथळा निर्माण होत आहे. गॅरेज वाले बेवारस ,भंगार,वाहनधारकास सात दिवसाची नोटीस बजावून सात दिवसात वाहने न उचलल्यास सात दिवसानंतर सदरील वाहने जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. सदरील वाहने जप्त करण्याची कारवाई येत्या २ ऑगस्ट२०२१ पासून सुरू करण्यात येणार असून ही मोहीम महिनाभर चालणार आहे. या मोहिमेत महानगरपालिका, पोलीस व आरटीओ यांच्या वतीने संयुक्तपणे मोहीम राबवण्यात येणार आहे.

    रस्त्याच्या कडेला बेवारस व भंगार तसेच तात्पुरती उभे करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्याचे आदेश पथकाला प्रशासकांनी दिले. या वाहनांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गाडी नंबरसह अहवालाची सीडी तयार करून मनपा उपायुक्त यांच्याकडे पाठवण्यात यावे, तसेच पंधरा दिवसानंतर सदरील अहवाल आरटीओ यांना पाठवून संबंधित वाहनाचा व वाहनधारकाचा वाहन नोंदणी परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा संबंधीत वार्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.