सायकल ट्रॅक निर्मितीच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात; शहरात तयार होणार २० किमीचे सायकल ट्रॅक

एएससीडीसीएलने गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर सायकल ट्रॅक बनविण्यासाठी तज्ज्ञांनी छायाचित्र, नकाशांद्वारे सखोलपणे अभ्यास केला. डिझायनर आकाश जोशी यांची मदत घेतली.

औरंगाबाद:  शहरात तरूणाई आणि सायकलप्रेमींना स्वतंत्र ट्रॅक तयार करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) क्रांती चौक ते रेल्वेस्थानक पर्यंत बहुप्रतिक्षित ६ किलोमिटर लांबीच्या कॉरिडोर सायकल मार्गाचे काम सुरू केले आहे. या मार्गावर शहरातील पहिले सार्वजनिक सायकल ट्रॅक तयार होणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबाद शहराने भाग घेतला आहे़ या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील सायकल चालकांसाठी ट्रॅक बनवला जाणार आहे. मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी आॅक्टोबर महिन्यात शहरात २० किलो मिटरचे सायकल ट्रॅक तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ओपन स्ट्रीट इव्हेंटस्, सायकल रॅली, भागधारकांच्या सभा, नागरिकांचे  सर्वेक्षण असे अनेक उपक्रम घेण्यात आले. याशिवाय मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सायकल टू वर्क मोहिम देखील सुरू केली असून यामध्ये शहरातील व्यावसायिक उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आहेत. दरम्यान, क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत तीनशे मिटर लांबीचे रस्ते रंगवून तेथे सायकल ट्रॅक चिन्हांकित केले होते.

ट्रॅक चिन्हांकनानंतर बोल्लार्ड/पोल बसविण्यात आले असून फुटपाथ निर्मितीचे काम पूर्ण झाले. एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, स्नेहा मोहन, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद, आदित्य तिवारी, सायकलिस्ट नितीन घोरपडे उपस्थित होते. एएससीडीसीएलने गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावर सायकल ट्रॅक बनविण्यासाठी तज्ज्ञांनी छायाचित्र, नकाशांद्वारे सखोलपणे अभ्यास केला. डिझायनर आकाश जोशी यांची मदत घेतली. मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सायकल ट्रॅकच्या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. याशिवाय सायकल ट्रॅकची आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी भागधारक आणि सायकल असोसिएशनच्या बैठका घेतल्या. सायकलप्रेमींबरोबरच पादचाऱ्यांना या मार्गावरून जाता यावे, यासाठीची सोय करण्यात आली आहे. एएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कळ शिवम म्हणाले, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायकल ट्रॅक बनविण्याचे काम हाती घेतले आहे. सायकल ट्रॅक बरोबरच सुशोभिकरणाची प्रक्रिया या मार्गावर राबविली जाणार असल्याने शहरातील सौदर्यांमध्ये भर पडणार आहे.