पाळणा हालला ! ‘समृद्धी’ वाघिणीने दिला पाच बछड्यांना जन्म ;  बछड्यांच्या आगमनाने संग्रहालयातील वातावरण आनंदी

वाघीण आणि बछड्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी पिंजऱ्याच्या परिसरात हिटरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघीण आणि बछड्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या देखभालीसाठी २४ तास 'केअर टेकर'ची व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद: सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने शुक्रवारी पहाटे पाच बछड्यांना जन्म दिल्याची अधिकृत माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी दिली आहे. पाच बछड्यांच्या आगमनाने संग्रहालयातील वातावरण आनंदी झाले आहे. प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता १४ एवढी झाली आहे. यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये याच वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. कोरोनामुळे सद्यस्थितीला हे उद्यान बंद असले, तरी प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी ही गोड बातमी ठरली आहे.
पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. बछड्यांची काळजी त्यांची आई समृद्धी स्वत: घेत आहे. बछड्यांची आणि तिची प्रकृती चांगली आहे. वाघिणीची आणि बछड्यांची पाहणी करण्यासाठी प्राणिसंग्रहालय पशुवैद्यक हजर आहेत. ठराविक वेळानंतर ते पाहणी करीत आहेत. वाघीण आणि बछड्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी पिंजऱ्याच्या परिसरात हिटरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाघीण आणि बछड्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यांच्या देखभालीसाठी २४ तास ‘केअर टेकर’ची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंजऱ्याच्या परिसरात ‘केअर टेकर’शिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे डॉ. नाईकवाडे यांनी स्पष्ट केले.

१२ बछड्यांचे आई-वडील
सिद्धार्थ आणि समृद्धी या पिवळ्या वाघाच्या जोडीने आतापर्यंत १२ बछड्यांना जन्म दिला. १२ नोव्हेंबर २०१६ रोजी एक नर आणि दोन मादी अशा एकूण तीन बछड्यांना समृद्धीने जन्म दिला. २६ एप्रिल २०१९ रोजी एक नर आणि तीन मादी अशा चार बछड्यांचा जन्म झाला आणि आज २५ डिसेंबर २०२० रोजी पाच बछड्यांचा जन्म समृद्धी आणि सिद्धार्थ या जोडीपासून झाला आहे.