‘त्यांनी’ तिच्या नावाने रचला सापळा, आधी केली फेसबुकवर मैत्री, नंतर व्हॉट्सअपवर झाला मुक्त संवाद आणि त्यांनी तिला ‘असं’ गंडवल

फेसबुकवर मैत्रिणीशी दोस्ती करण्याची किंमत एका व्यक्तीला खूपच महागात पडली. महिलेच्या नावाआडून पुरुषाने टाकलेल्या या जाळ्यात रिटायर्ड रेक्टरला तब्बल 19 लाख 14 हजार रुपयांचा गंडा बसला. प्रकरण एवढे हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. औरंगाबाद सायबर पोलिसांनी या प्रकरणी जालन्यातील तीन आरोपींना अटक केली.

    औरंगाबाद : फेसबुकवर मैत्रिणीशी दोस्ती करण्याची किंमत एका व्यक्तीला खूपच महागात पडली. महिलेच्या नावाआडून पुरुषाने टाकलेल्या या जाळ्यात रिटायर्ड रेक्टरला तब्बल 19 लाख 14 हजार रुपयांचा गंडा बसला. प्रकरण एवढे हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. औरंगाबाद सायबर पोलिसांनी या प्रकरणी जालन्यातील तीन आरोपींना अटक केली.

    नेमकं काय घडलं?

    समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त रेक्टर श्यामलाल गंगाराम चौधरी (68, रा. तिसगाव ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 2019 मध्ये त्यांची फेसबुकवर स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीतूनच व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरु झाले. एप्रिल 2020 मध्ये स्नेहा जाधव हिने मुलगी आजारी असल्याचे सांगत चार हजार रुपये मागितले. जानेवारी महिन्यात ते परतही केले. तसेच स्नेहाने जालन्यात सासऱ्यांच्या नावे निशशा कॉम्प्लेक्स असून ते माझ्या व जावयाच्या नावे करायचे आहे, माझ्याकडे पैसे नाहीत अशी थाप मारली. पुढे विविध कारणे सांगत महाराष्ट्र बँकेच्या खात्यात 8 लाख 36 हजार रुपये आणि आणखी एका एसबीआय बँकेच्या खात्यात 9 लाख 28 हजार रुपये असे सुमारे 17 लाख 64 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता स्नेहाने सतत पैशांची मागणी सुरूच ठेवली. दरम्यान वारंवार पैशांची मागणी केल्याने चौधरी यांनी पुढचे पैसे देण्यास नकार दिला.

    मात्र पैसे न दिल्यास तुमचा मुलगा आणि जावयाला पुण्यात जाऊन गोळ्या घालू, अशी धमकी देणारा एसएमएस केला. ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून 24 तासात आरोपी जेरबंद केला. सायबर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण पोलिस कर्मचारी धुडकू खरे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के आणि छाया लांडगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींचा माग घेतला.

    दरम्यान या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती हाती आली. स्नेहा नावाच्या महिलेच्या नावाखाली जालन्यातील तीन पुरुषांनी चौधरी यांची ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यातील एक जण किराणा दुकानदार, रिक्षाचालक आणि एक जण विद्यार्थी आहे. विजय तुळजाराम मुंगसे, सय्यद अन्सार सय्यद अख्तर आणि संतोष विष्णू शिंदे अशी तिघांची नावे आहेत. स्नेहा जाधव यांच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाउंट या तिघांनीच काढले होते. तसेच चौधरी यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांच्याशी व्हॉट्सअपवर स्नेहा म्हणूनच चॅटिंग केल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणी आणखी कुणाचा हात आहे का, याचा तपास सुरु असून 4 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.