वक्फ बोर्डात बोगस ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्यांना तुरुंगात पाठवणार : खासदार इम्तियाज जलील

वक्फ बोर्डाने स्वत: २७ नोव्हेंबर २०२० रोजी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, बदलापूर जामा मस्जिद ट्रस्टची जागेकरिता जे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले ते खोटे व बनावटी आहे, तरी ४ महिन्यांनंतरही वक्फ बोर्डाचे अधिकारी व कायदेशीर सल्लागार संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याऐवजी गप्प का ?

  • खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डच्या बोगस एनओसी चा केला भांडाफोड
  • वक्फ बोर्डाने स्वत: बोगस नाहरकत प्रमाणपत्राचे मान्य केले, तरी सुध्दा वक्फ बोर्डचे अधिकारी गप्प का ?
  • कायदेशीर कारवाई न करता बोगसगिरी करणाऱ्यांच्या पाठीशी वक्फ बोर्ड का उभी ? : जलील यांचे वक्फ बोर्डावर गंभीर आरोप

औरंगाबाद : आज खासदार इम्तियाज जलील यांनी सुभेदारी विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेऊन वक्फ बोर्डात सुरु असलेल्या बोगस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. खाजगी वकील, वक्फ बोर्डाचे काही अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य नागरीकांना वक्फ बोर्ड जागेसंबंधी बोगस नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्ड कार्यालयातच करतात असा थेट आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावला.

वक्फ बोर्डाने स्वत: २७ नोव्हेंबर २०२० रोजी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, बदलापूर जामा मस्जिद ट्रस्टची जागेकरिता जे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले ते खोटे व बनावटी आहे, तरी ४ महिन्यांनंतरही वक्फ बोर्डाचे अधिकारी व कायदेशीर सल्लागार संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याऐवजी गप्प का ? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना खासदार इम्तियाज जलील यांनी माहिती दिली की, तालुका अंबरनाथ जि. ठाणे येथील बदलापूर जामा मस्जिद ट्रस्ट च्या ट्रस्टी ने त्यांच्या ताब्यातील वक्फ बोर्डाची जागा सर्वे नं. १४८/१, २४३/५, २४३/४, ३६/४४ तसेच चामटोली येथील सर्वे क्र. ५९/३ मधील जागा डॉ कृष्णा भास्कर निमसाखरे व इतर यांना एक कोटी हुन जास्त रकमेत विकली. डॉ. कृष्णा भास्कर निमसाखरे व त्यांच्या फॅमिलीतील सर्व सदस्य हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी रुग्णालय बांधण्याकरिता सदरील जागा विकत घेतली होती.

डॉ. कृष्णा भास्कर निमसाखरे यांना रुग्णालय बांधण्याकरिता त्यांचे नाव ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात लावण्यासाठी वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. डॉक्टर यांनी बदलापुर जामा मस्जिद ट्रस्ट च्या ट्रस्टींना वारंवार मागणी करुन सुध्दा त्यांनी त्यांना वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, उलट त्यांनाच सांगितले की, तुम्ही तुमच्या स्तरावरुन महाराष्ट्र राज्य वक्फ मुख्य कार्यालय औरंगाबाद येथून प्रमाणपत्र मिळवून घ्यावे अशी ताकिद दिली.

डॉक्टर कृष्णा भास्कार निमसाखरे यांनी औरंगाबाद वक्फ बोर्ड कार्यालयात संपर्क करुन ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांना घुमजाव करण्यात आले. तेव्हा तेथे उस्मानाबादचे एक अनोळखी नामांकित वकिलांनी जवळ येऊन अशी थाप मारली की, मी तुम्हाला वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देतो, साध्या पध्दतीने वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र मिळत नाही, मी वक्फ बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तुम्हाला रुग्णालय बांधण्याकरिता व तुमचे नाव ७/१२ उताराऱ्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देतो.

उस्मानाबादच्या वकीलाने डॉक्टर यांना सांगितले की, तुम्हाला वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळून जाईल त्यासाठी १५ लाख रुपये मोजावे लागतील. तेव्हा डॉक्टर व वकिल यांची आपसात तडजोड होवुन नऊ लाख रुपये देण्याचे ठरले. डॉक्टर कृष्णा निमसाखरे यांना रुग्णालय लवकर बांधायचे असल्याने त्यांनी उस्मानाबादचे असलेले वकिल यांच्या बँक खात्यात आरटीजीएस पध्दतीने ऑनलाईन ९ लाख रुपये दिले. त्यानंतर वकिल याने त्यांना वक्फ बोर्डाच्या काही अधिकारी व कर्मचारी संगणमताने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बनवुन दिले.

डॉक्टर कृष्णा निमसाखरे यांनी वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले म्हणून रुग्णालय बांधण्याकरिता पुढची कार्यवाही सुरु केली, तेव्हा डॉक्टर यांना महसुल विभागातील काही जणांनी हे प्रमाणपत्र खोटे असल्याची शक्यता वर्तवली तेव्हा डॉक्टर कृष्णा निमसाखरे यांनी ना हरकत प्रमाणपत्राची शहानिशा करण्यासाठी वक्फ बोर्डात दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी माहिती अधिकार दिला. तेव्हा जन माहिती अधिकारी सियानत विभाग, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी दिनांक २७ नोव्हेंबर २०२० च्या पत्रान्वये स्पष्ट केले की, वक्फ बोर्डाने आपल्याला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र हे खोटे व बनावटी असुन त्याची प्रत वक्फ बोर्ड कार्यालयात उपलब्ध नाही.

डॉक्टर कृष्णा भास्कार निमसाखरे यांना कळून चुकले की, आता आपली फसवणुक झाली आहे तेव्हा त्यांनी सदरील प्रकरणाची तक्रार थेट वक्फ मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली, तेव्हा नवाब मलिक यांनी सदरील संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत थेट आरोप लावले की, वक्फ बोर्ड कार्यालयात असे अनेक वकिल व भामटेगिरी करणारे लोक वक्फ बोर्डाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन तेथे आलेल्या लोकांची दिशाभुल करुन त्यांना खोटे, बनावटी कागदपत्रे तयार करुन देतात. दररोज अशा अनेक लोकांना तेथे गंडविण्याचे काम बिनधास्त सुरु असुन एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

तसेच खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, जेव्हा वक्फ बोर्डाने स्वत: माहिती अधिकारात लिहुन दिले की, सदरील जागेचे नाहरकत प्रमाणपत्र खोटे व बनावटी आहे त्याच्या वक्फ बोर्ड कार्यालयाशी काहीही संबंध नाही तेव्हा वक्फ बोर्डाचे अधिकारी व कायदेशीर सल्लागारांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल करणे गरजेचे होते. परंतु काही वक्फ बोर्डाचे अधिकारी व कर्मचारीच या भ्रष्टाचार व बोगसगिरीच्या कटात सामिल असल्याने वक्फ बोर्डाने कोणतीही कायदेशिर कार्यवाही न करता उलट भामटेगिरी व शासनाची फसवणूक करुन सर्वसामान्य लोकांना गंडा घालणाऱ्यांची साथ दिली.

खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे बनावटी व खोटे नाहरकत प्रमाणपत्र कोणी बनवुन दिले ? वक्फ बोर्डाचे लेटर हेड, स्टँप व प्रमाणपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी कोणी केली ? असे अनेक गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले. तसेच मागणी केली की, पोलीस विभागाने सदरील प्रकरणाची कसून चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे.

याच दरम्यान सदरील वक्फ जमीनीतून नॅश्नल हायवेचा मार्ग जात असल्याने त्यांनी सुध्दा काही जागा संपादित केली असून त्याचा मोबदला वक्फ बोर्डाला मिळणे गरजेचे होते, परंतु सदरील पैसा सुध्दा बदलापुर जामा मस्जिद ट्रस्ट च्या ट्रस्टी ने स्वत:च्या नावावर घेऊन वक्फ बोर्डाचे आर्थिक नुकसान केले.

तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची तक्रार करणार

डॉ. कृष्णा भास्कर निमसाखरे यांना सदरील जागेवर त्यांचे रुग्णालय बांधण्याकरिता ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात त्यांचे नाव नोंदविणे गरजेचे होते त्यामुळे त्यांनी सदरील अहवाल तेथील तहेसिलदार यांना सादर केला. तेव्हा तहेसिलदार यांनी प्रत्येकी एक एकर करिता एक लाख रुपय घेतले असुन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपये डॉक्टर यांच्याकडून घेतल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आपण तलाठी, मंडळ अधिकारी व तहेसिलदार यांची महसुल विभागाच्या मुख्य सचिव व संबंधित मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

१३ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या बैठकी मध्ये मुद्दा उचलणार

१३ मार्च २०२१ शनिवार रोजी ईस्लाम जिमखाना मुंबई येथे वक्फ मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वक्फ सदस्यांची महत्वपुर्ण बैठक होणार असुन त्या बैठकीमध्ये आपण हा मुद्दा सर्व कागदपत्र व सर्वांच्या नावासह उपस्थित करणार आहे. सदरील बैठकीमध्ये यापुर्वी सुध्दा किती जणांना अशा प्रकारचे वक्फ बोर्डामार्फत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

इतरही सर्व नाहरकत प्रमाणपत्राची शहानिशा केली जाणार

खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना आवाहन केले की, ज्यांनी ज्यांनी वक्फ बोर्ड कार्यालयाकडून वेगवेगळ्या मोक्याच्या जागेकरिता नाहरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे त्यांनी त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र तपासुन घ्यावे किंवा आमच्या कडे पाठवावे जेणेकरुन आम्ही त्यांची संपुर्ण शहानिशा करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आहे.

जालना रोड वरील वक्फ जागेच्या प्रकरणात पोलीस तपासावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी स्वत: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जालना रोड वरील १०० कोटीच्या वक्फ जागेच्या चौकशीची तक्रार दिली होती तेव्हा गृहमंत्री यांनी औरंगाबाद चे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना बोलावून सदरील प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करुन सदरील संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे व तसा अहवाल गृहमंत्रालयाला पाठविण्याचे आदेशित केले होते. परंतु आजपर्यंत पोलीस विभागाकडून कोणतीही माहिती, पत्र अथवा चौकशी सुरु झाल्याचे आमच्या निदर्शनास आले नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.