बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा राजीनामा; कोण झालेत नवे अध्यक्ष, वाचा सविस्तर

राहुल बजाज हे १९७२ सालापासून कंपनीसोबत कार्यरत होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ कंपनीसोबत काम केलं आहे. त्यांच्या वयाचा विचार करता हा राजीनामा स्वीकारल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ३० एप्रिल हा त्यांचा कामाचा शेवटचा दिवस असेल.

    मुंबई : बजाज ऑटो या कंपनीचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा कंपनीने आज केली. त्यांच्या जागी आता कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते १ मे पासून आपला पदभार स्वीकारणार आहेत.

    राहुल बजाज हे १९७२ सालापासून कंपनीसोबत कार्यरत होते. त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ कंपनीसोबत काम केलं आहे. त्यांच्या वयाचा विचार करता हा राजीनामा स्वीकारल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ३० एप्रिल हा त्यांचा कामाचा शेवटचा दिवस असेल.

    राहुल बजाज यांचं कंपनीच्या यशामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. त्यांचा पाच दशकांहून अधिक काळचा अनुभव आणि त्यांची कंपनीशी असणारी बांधिलकी यामुळे ते कंपनीशी कायम जोडलेले राहतील. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि शिकवणुकीचा फायदा यापुढेही कंपनीला होत राहील. ते सल्लागार म्हणून सदैव कंपनीच्या सोबत असतील. त्याचबरोबर १ मेपासून ते कंपनीच्या चेअरमन एमेरिटस या पदावर पुढच्या पाच वर्षांसाठी काम करतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.