‘ही’ गाडी लवकरच होतेय हद्दपार, भारतीय ‘या’ आलिशान गाडीला कायमचे मिस करणार!

कंपनीची पहिली SUV म्हणून Endeavour २००३ साली भारतात लाँच झाली, तेव्हापासूनच या कारने संपूर्ण एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. १८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून Endeavour कारने भारतीय बाजारात आपला ठसा उमटवलाय.

    नवी दिल्ली : अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी Ford Motors ने काही दिवसांपूर्वीच भारतातून आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्डने भारतात उत्पादन थांबवण्याची (Stop Production) ची घोषणा केली आहे, पण कंपनीने त्याआधी आपली लोकप्रिय एसयुव्ही Endeavour वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

    कंपनीची पहिली SUV म्हणून Endeavour २००३ साली भारतात लाँच झाली, तेव्हापासूनच या कारने संपूर्ण एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. १८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून Endeavour कारने भारतीय बाजारात आपला ठसा उमटवलाय. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याआधी फोर्डने Endeavour SUV ची विक्री आणि उत्पादन सुरू ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, अशी माहिती फोर्डने दिली आहे. सविस्तर बघूया काय म्हटलं फोर्डने, कशी होती Endeavour आणि एन्डेव्हर बंद झाल्याचा कोणाला होणार फायदा?

    Endeavour साठी ​शक्य ते सर्व प्रयत्न केले – फोर्ड

    भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याआधी फोर्डने Endeavour SUV ची विक्री आणि उत्पादन सुरू ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. अनेक वाहन कंपन्यांशी करार करून भागीदारीसह उत्पादन घेण्याचा (कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी दुसऱ्या OEM सोबत भागीदारी ) कंपनीचा प्रयत्न होता, पण कोणत्याच कंपनीकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेरीस काहीच तोडगा न निघाल्याने कारखाना बंद करावा लागल्याने Endeavour ही बंद करावे लागली, असे फोर्डने नमूद केले आहे. शक्य ते सर्व प्रयत्न करूनही Endeavour SUV ला दुर्देवाने भारतात वाचवता आले नाही, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

    Endeavour सीबीयू युनिट म्हणूनही भारतात येणार नाही

    फोर्ड एन्डेव्हरच्या (Ford Endeavour) विक्रीबद्दल बोलायचे झाले तर ऑगस्ट २०२१ मध्ये या पूर्ण आकाराच्या एसयुव्ही सेगमेंटचा वाटा ४४ टक्के होता, परंतु आता देशातील डिलर्सकडे स्टॉक उपलब्ध असेपर्यंतच या कारची विक्री होणार आहे, त्यानंतर Endeavour बंद होईल. फोर्ड कंपनी यापुढे केवळ प्रीमियम कार पूर्ण बिल्ड युनिट (CBU) म्हणून भारतात विकणार आहे. पण, एन्डेव्हरला सीबीयू युनिट म्हणून देखील भारतामध्ये आणण्यात येणार नाही.

    ​१८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून SUV सेगमेंटमध्ये आहे वेगळी ओळख

    वर्ष २००३ मध्ये कंपनीची पहिली एसयुव्ही म्हणून Endeavour भारतामध्ये सर्वप्रथम लाँच झाली. त्यानंतर कंपनीने २०१६ मध्ये Endeavour ची सेकंड जनरेशन भारतात आणली आणि नंतर शेवटचे मॉडल म्हणजे सध्याचे न्यू जनरेशन फेसलिफ्ट मॉडल ठरले. १८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून Endeavour या कारने भारताच्या बाजारात आपला ठसा उमटवलाय. यामध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, पॉवर्ड टेलगेट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, कॉल आणि ऑडिओसाठी स्टियरिंग माऊंट कंट्रोल, 8-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॅनोरामिक सनरूफ, पॉवर-एडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएम असे अनेक लेटेस्ट फीचर्स कंपनीने दिले आहेत.

    एन्डेव्हरचे चाहते निराश, कोणाला होणार फायदा ?

    दरम्यान, फोर्ड एन्डेव्हरने एक वेगळा ग्राहकवर्ग निर्माण केला असून या एसयुव्हीचे प्रचंड चाहते आहेत. अशा स्थितीत अनेक ग्राहक ही कार बंद झाल्याने निराश झालेत. मार्केटमध्ये Toyota Fortuner, Kia Carnival आणि MG Gloster सोबत Endeavour ची स्पर्धा होती. पण आता Endeavour बंद होण्याचा लाभ कोणत्या मॉडलला मिळणार हे पहावे लागेल.