जगातील पहिली सोलर SUV बाजारात दाखल, एका चार्जिंगमध्ये ८०० किलोमीटर अंतर करणार पार , जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

कॅलिफोर्नियाच्या हंबल मोटर्स या स्टार्टअप कंपनीने आपली नवी सौरऊर्जेवर चालणारी ईव्ही सादर केली आहे. डिझाईन आणि बॉडी टाईपवरून हे सौरऊर्जेवर चालणारे एसयुव्हीचे मॉडेल आहे.

    कॅलिफोर्नियाच्या हंबल मोटर्स (Humble Motors) या स्टार्टअप कंपनीने आपली नवी सौरऊर्जेवर (solar energy) चालणारी ईव्ही (electric vehicle) सादर केली आहे. डिझाईन आणि बॉडी टाईपवरून हे सौरऊर्जेवर चालणारे जगातील पहिलेच एसयुव्हीचे मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचा असा दावा आहे की, सूर्याच्या प्रकाशकिरणांद्वारे या गाडीची बॅटरी चार्ज (charge) होते आणि उत्तम ड्रायव्हिंग रेंज देते.

    छत आणि खिडक्यांवर असलेल्या सोलार पॅनलद्वारे होणार चार्जिंग

    या गाडीचे डिझाईन बऱ्याच अंशी क्रॉसओव्हर मॉडेलप्रमाणे आहे. याच्या छतावर आणि खिडक्यांवर एकूण 80 वर्गफुटांचे सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. हे पॅनल सूर्याच्या प्रकाशातून या गाडीत लावण्यात आलेली बॅटरी चार्ज करते. कंपनीने सांगितले आहे की, ही एसयूव्ही जर फक्त सोलार पॅनलद्वारे झालेल्या चार्जिंगद्वारे चालण्यात आली तर ही दररोज साधारण 96 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

    उत्तम ड्रायव्हिंग रेंज देणार हंबल वनची एसयुव्ही

    हंबल वनचे वजनही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे जेणेकरून उत्तम ड्रायव्हिंग रेंज मिळू शकेल. याचे एकूण वजन 1,814 किलो आहे जे Tesla Model Sच्या तुलनेत साधारण 348 किलोंनी कमी आहे. गाडीच्या आतील बॅटरीवर एकाच चार्जिंगमध्ये साधारण 800 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज ही गाडी देते. इतकेच नव्हे, तर याचा पिकअपही टेस्लाच्या तुलनेत अतिशय चांगला आहे. यात साधारण पाच लोक बसू शकतात. याची लांबी 198 इंच आहे.

    जाणून घ्या किती असेल या गाडीची किंमत

    हंबल मोटर्सने अद्याप या गाडीबद्दलची तांत्रिक माहिती दिलेली नाही. पण दररोजच्या प्रवासासाठी ही एसयुव्ही एक उत्तम पर्याय ठरणार आहे. ही गाडी बाजारात येण्याच्या आधीच त्याच्या किंमतीबद्दल सांगणे अवघड आहे, पण जाणकारांच्या अंदाजानुसार याची किंमत 1,09,000 अमेरिकन डॉलर्सच्या आसपास असेल. याचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे आणि ही कार 2024 पर्यंत बुकिंग केलेल्या लोकांकडे पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.