खास भारतीयांसाठी डिझाईन केलेली Hyundai ची दमदार 7 सीटर SUV लाँचिंगसाठी सज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयुव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, तेव्हा ह्युंदाई अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल.

    मुंबई : ह्युंदाईने (Hyundai) गेल्या महिन्यात आपल्या आगामी सेव्हन सीटर एसयुव्ही अलकाझारची (SUV Alcazar) घोषणा केली होती. ही कार केवळ भारतात लाँच करण्यात येणार आहे. अलकाझार (Alcazar) ही मध्यम आकाराच्या एसयुव्हीवर (मिड साइज SUV) आधारित अलणार आहे. ही क्रेटापेक्षा थोडी मोठी कार असेल. या कारच्या तिसर्‍या रांगेतील आसनेही थोडी मोठी असतील. दरम्यान आता, असे म्हटले जात आहे की, ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कारचे लीक झालेले फोटोज समोर येत आहेत.

    ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) काही दिवसांपूर्वी या कारविषयी म्हटले होते की, कंपनी यावर्षी अलकाझार (Hyundai Alcazar) मॉडेलच्या जागतिक पदार्पणासह भारतातल्या सात सीटर प्रीमियम एसयुव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ग्राहक बिझनेस ट्रॅव्हल करत असेल अथवा कौटुंबिक सहलीवर असेल, तेव्हा ह्युंदाई अलकाझार ग्राहकांना गतिशीलता प्रदान करेल.

    HMIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसएस किम म्हणाले होते की, “2021 हे वर्ष एचएमआयएलच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय जोडेल, कारण आम्ही नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करून त्यास नव्याने डिफाईन करण्यास तयार आहोत. देशात ह्युंदाईला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलताना किम म्हणाले की, “आम्ही ह्युंदाई Alcazar च्या जागतिक लाँचिंगसह भारतीय ग्राहकांप्रती आमच्या वचनबद्धतेवर जोर देऊ. Hyundai Alcazar सात सीटर एसयुव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करेल, या सेगमेंटमध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 500, नुकत्याच लाँच झालेल्या 2021 टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लस या एसयुव्हींना ह्युंदाईची Alcazar टक्कर देईल.

    HMIL ने म्हटले आहे की, Alcazar लक्झरी डिझाईनकडून प्रेरित आहे, जे आकर्षक आणि प्रशस्त तसेच मजबुतीचं प्रतिक आहे. ही कार अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि टेक्नोसॅव्ही ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने त्यांच्या या आगामी उत्पादनाशी संबंधित अधिक माहिती दिलेली नाही.

    शानदार डिझाईन

    दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. ही कार थोडी वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे, जेणेकरून ही कार इतर कार्सपेक्षा वेगळी दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलॉय व्हिल्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

    फीचर्स

    कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयुव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

    पॉवरफुल इंजिन

    या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क जनरेट करतं.

    भारतात 3200 कोटींची गुंतवणूक

    ह्युंदाई कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ह्युंदाई आगामी काळात अनेक वाहने लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पॅसेंजर व्हेईकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

    इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर

    कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.