meet helmet man who is giving free helmet to people in india
रस्ते अपघातात मित्राचा जीव गेला म्हणून आज करतोय असं काम की, त्याच्यासाठी 'कायपण' करणारा असा विरळाच

अनेकजण बाइक चालविताना शिरोवेस्टण घालायचंच टाळतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या जगात एक अवलिया असाही आहे की, त्याला लोकं Helmet Man म्हणून ओळखतात याचं कारण असं आहे की, तो लोकांना मोफत शिरोवेस्टण (Helmet) वाटप करत फिरत असतो.

भारतात दरवर्षी रस्ते अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अनेकदा वेगवेगळे प्रश्न समोर दत्त म्हणून उभे राहतात. कोणीतरी शिरोवेस्टण घातलेलं नसतं, कोणाला तरी एखाद्याच्या चुकीमुळे या जगाचा निरोप घ्यावा लागतो. २०१८ मध्ये ४३, ६०० लोकांचा मृत्यू शिरोवेस्टण न घातल्याने झाला होता. असं आम्ही नाही आकडे बोलतात.

म्हणजेच याचाच अर्थ अनेकजण बाइक चालविताना शिरोवेस्टण घालायचंच टाळतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या जगात एक अवलिया असाही आहे की, त्याला लोकं Helmet Man म्हणून ओळखतात याचं कारण असं आहे की, तो लोकांना मोफत शिरोवेस्टण (Helmet) वाटप करत फिरत असतो.

आहेत बिहारचे रहिवासी

बिहारच्या कैमूरमधील बगाढी गावात राहणारे राघवेंद्र कुमार. आता ते साऱ्या जगाला शिरोवेस्टणाचं महत्त्व पटवून देत फिरत असतात. म्हणूनच लोकं त्यांना हेल्मेट मॅन म्हणतात. राघवेंद्र आपल्या लहान भावडांमध्ये सर्वात धाकटे. त्याचे बाबा राधेश्याम सिंह शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना पुढे शिकणाची दारे बंद झाली. तथापि, १० वी-१२वी पास होत-होत राघवेंद्रच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्या वाढतच राहिल्या. त्यांच्या कुटुंबियांकडे एवढे पैसेही नव्हते त्यामुळे त्यांना शिक्षणावर पाणी सोडावं लागलं.

पुन्हा बनारसला आले

राघवेंद्र स्वत:च्या पायावर उभं राहता यावं म्हणून कामधंदा करण्यासाठी उत्तरप्रदेशातल्या बनारसमध्ये दाखल झाले. येथे जवळपास ५ वर्ष त्यांनी छोट्या-मोठ्या विविध नोकऱ्या केल्या शिक्षणासाठी पैसे साठवले. ही गोष्ट आहे २००९ सालची. ते लॉ ग्रॅज्युएट होण्यासाठी दिल्लीला गेले. येथे त्यांची अनेक जणांशी मैत्री झाली.

एका मित्राचा जीव गेला

या मित्रांपैकीच एक होता कृष्ण, जो आपल्या परिवारातील एकुलता एक मुलगा होता. खूप शिकलेला होता. ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर हेल्मेट विना बाइक चालवत असताना कृष्णाच्या डोक्याला मार लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने राघवेंद्रच्या काळजाचं पाणी पाणी झालं. यानंतर त्यांनी कृष्णाच्या परिवाराला झालेल्या यातना अनुभवल्या. कितीही झालं तरी तो त्यांचा जीवाभावाचा मैतर होता. म्हणूनच राघवेंद्रने एक निर्णय घेतला त्याचा मित्र आणि त्याच्या परिवारासोबत जे झालं ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू देणार नाही.

जुन्या पुस्तकांच्या बदल्यात फ्रि शिरोवेस्टण

इंडिया टाइम्स दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, या मोहिमेअंतर्गतच त्यांनी जुन्या पुस्तकांच्या बदल्यात लोकांना ठिकठिकाणी फ्रि हेल्मेटचं वाटप सुरू केलं. जुन्या पुस्तकांच्या बदल्यात हेल्मेट का? या प्रश्नावर ते म्हणतात, याचे दोन मोठे फायदे आहेत पहिला असा की, याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. दुसरा हा की, जुन्या पुस्तकांच्या बदल्यात गरीब मुलांच्या जीवनात त्यांना बदल घडवायचा आहे.

जुन्या पुस्तकांनी केलीये कमाल

राघवेंद्र यांच्या मते, त्यांनी दिलेल्या जुन्या पुस्तकांच्या जोरावरच गरीब मुलांनी बरीच मोठी झेप घेतली आहे. आपल्या मोहिमेचा विस्तार करतानाच राघवेंद्र यांनी फ्रि हेल्मेटसोबतच ५ लाख रुपयांचा अपघात विमा देणं सुरू केलं आहे. यात स्टार हेल्थ अँड अलाइड इंश्युरन्सने त्यांना मदतीचा हात देऊ केलाय. राघवेंद्र यांनी आजवर देशभरात ४८००० हून अधिक हेल्मेटसह ६ लाख मुलांना मोफत पुस्तकांचे वाटप केले आहे.

नोकरीला ठोकला रामराम, घरावर ठेवलं तुळशीपत्र

राघवेंद्र यांना सरकारने आणखी एक नियम करून त्याची अंमलबजावणी करावी अशी आशा आहे. या नियमांतर्गत कोणत्याही राज्यात टोल आकारणीसोबतच विना हेल्मेट प्रवास करण्याची परवानगीच देण्यात येऊ नये असं त्यांना वाटतं. याने होणाऱ्या दुर्घटना टळतील. लोकांचे प्राण वाचतील. कोणीही आपल्या कुटुंबापासून वेगळं होणार नाही.

राघवेंद्र यांचा आजवरचा हा प्रवास खरंच सोपा नव्हता. त्यांना सर्वप्रथम आपल्या नोकरीला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वी हेल्मेट खरेदी करण्यासाठी त्यांना अधिक पैशांची नड होती यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि त्यानंतर पत्नीचे दागिनेही विकले.