जुनी कार करा स्क्रॅप, नव्या कारवर मिळवा ५% सूट; असा घ्या सरकारी स्किमचा फायदा

जुन्या वाहनांना भंगारात काढण्याच्या बदल्यात कंपन्या ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर जवळपास ५ टक्के सूट देतील. स्क्रॅपिंग पॉलिसी ( वाहनांना स्वत:हून भंगारात काढण्याची योजना) ची घोषणा 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या पॉलिसीत ४ टप्पे असतील ज्यापैकी एका टप्प्यात सूट देण्याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

  नवी दिल्ली : जर तुमची कार (Car) जुनी झालीये आणि नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. स्क्रॅपिंग पॉलिसी (Vehicle Scrapping Policy) च्या अंतर्गत जर तुम्ही जुनी गाडी स्क्रॅप (भंगार) झाल्यावर कोणतेही नवीन वाहन खरेदी करणार असाल तर तुम्हाला ५ % डिस्काऊंट मिळणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: केंद्रीय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे.

  गडकरी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, जुन्या वाहनांना भंगारात काढण्याच्या बदल्यात कंपन्या ग्राहकांना नवीन वाहन खरेदीवर जवळपास ५ टक्के सूट देतील. स्क्रॅपिंग पॉलिसी ( वाहनांना स्वत:हून भंगारात काढण्याची योजना) ची घोषणा 2021-22 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या पॉलिसीत ४ टप्पे असतील ज्यापैकी एका टप्प्यात सूट देण्याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

  जुन्या वाहनांची होणार फिटनेस टेस्ट

  पॉलिसी अंतर्गत जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. या अनुसार स्वत:च्या मालकीच्या वाहनांना २० वर्षांनंतर आणि व्यापारी वाहनांना १५ वर्षांनंतर फिटनेस टेस्ट करून घ्यावी लागेल.

  गडकरी म्हणाले, ‘ या पॉलिसीचे चार प्रमुख टप्पे आहेत. सूट व्यतिरिक्त, प्रदूषण पसरविणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स आणि शुल्क आकारण्याची तरतूद आहे. त्यांना अनिवार्य फिटनेस आणि प्रदूषण टेस्ट यातून जावेच लागेल यासाठी देशात ऑटोमेटेड फिटनेस सेंटरची गरज भासणार आहे आणि आम्ही यावरच काम करत आहोत.

  फिटनेस टेस्टवर एवढा होणार खर्च

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिटनेस टेस्टसाठी जवळपास ४०,००० रुपयांपर्यंत खर्च येईल, जो रोड टॅक्स आणि ग्रीन टॅक्स यांच्याव्यतिरिक्त आकारण्यात येईल. हे फिटनेस प्रमाणपत्र ५ वर्षांसाठी वैध असणार आहे. आपले जुने वाहन फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच त्याला रस्त्यावर चालविण्याची परवानगी असणार आहे. जर वाहन टेस्टमध्ये फेल झालं तर त्याचे रजिस्ट्रेशन होणार नाही आणि त्याला स्क्रॅप (भंगारात) देण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही.