मॉन्सूनमध्ये तुमच्या गाडीचा पावसापासून बचाव करण्यासाठी या आहेत टिप्स

पावसात गाडी चालवण्यात वेगळी गंमत आहे, पण कधीकधी ते धोकादायकही ठरू शकते. सुरक्षितपणे गाडी चालवण्याची, विशेषतः अवघड पृष्ठभागांवर गाडी चालवताना विशेष खबरदारी घेतानाच वाटेत कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी गाडीचीही योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

अतुल अगरवाल

पावसात (rainy season) गाडी चालवण्यात वेगळी गंमत आहे, पण कधीकधी ते धोकादायकही ठरू शकते. सुरक्षितपणे गाडी चालवण्याची, विशेषतः अवघड पृष्ठभागांवर गाडी चालवताना विशेष खबरदारी घेतानाच वाटेत कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी गाडीचीही योग्य काळजी (care) घेणे आवश्यक असते. भारतात, काही शहरांमध्ये पाणी तुंबण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता असल्यामुळे गाडीला कुठलीही हानी पोहोचू नये, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यासाठी गाडीला कसे सज्ज करायचे आणि पावसात गाडी चालवण्याचा आनंद कसा लुटायचा, याचे काही उपाय पुढीलप्रमाणे :

टायरची तपासणी

रस्त्यांच्या थेट संपर्कात येणारा टायर हा गाडीचा एकमेव भाग आहे. त्यामुळे मॉन्सून काळात गाडी रस्त्यावर घेऊन जाण्यापूर्वी टायरची तपासणी ( tyres checking) करणे अप्रिय घटना टाळण्यासाठी महत्त्वाचे असते. असमान आणि झिजलेले टायर असतील तर मुसळधार पावसात रस्त्यात साचलेल्या पाण्यामध्ये गाडीला योग्य पकड मिळत नाही. टायरमधील दाबामुळे देखील पकडीवर (ग्रिप) परिणाम होत असतो. टायरमध्ये कमी हवा (air) असावी, असा सर्वसाधारण समज असला तरी हा समज चुकीचा असून टायरमध्ये पूर्ण क्षमतेने हवा भरलेली असेल तर पाण्यातून मार्ग काढणे आणि सर्वोत्तम ग्रिप (grip) मिळवणे सोपे होते.

आपल्या देशातील एक घातक पद्धत म्हणजे एक किंवा दोनच टायर बदलणे (tyres change). यामुळे गाडी चालवण्याच्या गुणवत्तेवर तर वाईट परिणाम होतोच, पण टायरची हानी देखील अधिक वेगाने होते. त्याचप्रमाणे, गाडीसोबतच्या यूजर मॅन्युअलमध्ये (user manual) नमूद केलेल्या निर्देशांनुसारच टायर वापरा. त्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी आणि अप्रिय घटना टाळण्यासाठी नियमित अलाइनमेंट करा. सर्व ब्रँडच्या टायरना ट्रेड इंडिकेटर्स असतात, ज्यामुळे त्यांची झीज टाळण्यासाठी मदत होते. मॉन्सूनपूर्वी तुमच्या जुन्या टायरची तपासणी करून ते बदलणे नेहमीच श्रेयस्कर असते.

पावसापूर्वी गाडीच्या अंतर्गत भागाची देखभाल करा

बरेच लोक ही गोष्ट करत नाहीत, पण गाडीच्या अंतर्गत भागात जिवाणूंची वाढ होऊ नये, यासाठी वातानुकूलन यंत्रणेचे निर्जंतुकीकरण करून घेणे महत्त्वाचे असते. यामुळे कुबट वास देखील येत नाही. फ्रॉस्टिंग टाळण्यासाठी वातानुकूलन यंत्रणा निश्चित सेटिंगनुसार (विहित सूचनेनुसार) चालवली पाहिजे. योग्य सेटिंग काय आहे, हे समजून घेण्यासाठी तुमच्या अधिकृत ब्रँड एग्झिक्युटिवशी संपर्क साधा. पाण्यासमवेत संपर्क येऊ नये, यासाठी वायरिंगचीही तपासणी केली पाहिजे. गाडीत कुबट वास येऊ नये, यासाठी सीट कव्हर्समधील दमटपणा काढून टाकण्यासाठी गाडीत पोर्टेबल व्हॅक्यूम क्लीनर ठेवा. कितीही प्रयत्न केला तरी कधीकधी पावसाचे पाणी गाडीत शिरतेच. छोट्या छोट्या गोष्टी केल्यास दीर्घकालीन नुकसान टाळता येऊ शकेल. रबर मॅट्सऐवजी फॅब्रिक मॅट्स वापरणे हा देखील एक उपयुक्त पर्याय आहे.

दृष्यमानतेसाठी वायपर

गाडीच्या दर्शनीभागातील काचेवर (विंडस्क्रीन) असलेले वायपर्स हा बहुदा गाडीचा सर्वाधिक दुर्लक्षित भाग असावा. सदैव आपल्या डोळ्यांसमोर असून देखील ही परिस्थिती आहे. अनेक गाडीचालक वायपर्सचे आयुष्य उलटून गेले तरी तेच वायपर्स वापरत राहातात. मात्र, मॉन्सून काळात यामुळे दृष्यमानतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्यवेळी, खरं म्हणजे पावसाळ्यापूर्वी ते बदलले गेले पाहिजेत.

मॉन्सून हॅक्स

लोक दोन प्रकारचे असतात. पावसात गाडी चालवणे आवडणारे आणि दुसरे म्हणजे गाडी चालवण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट बघणारे. तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता हे महत्त्वाचे नाही; कधी ना कधी पावसात देखील गाडी चालवण्याची वेळ प्रत्येकावर येतेच. अशा वेळी गैरसोय टाळण्यासाठी काही छोट्या गोष्टी देखील उपयुक्त ठरतात. पाऊस पडल्यानंतर शहरातील गर्दीचे रस्ते शोधण्यासाठी मॅप ॲप्सचा वापर करा. नवीन भागांमध्ये जाण्यापूर्वी मित्रांचा सल्ला घ्या अथवा त्या भागात पाणी तुंबते का, हे जाणून घ्या. चांगले वायुविजन असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करणे कधीही चांगले. जर तुम्ही कारपुलिंगचा वापर करत असाल तर निष्काळजी प्रवाशामुळे तुमच्या गाडीच्या सीट्सचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या दिवसांत जुने सीट कव्हर्स आणि मॅट्सचा वापर करणे श्रेयस्कर असते. अंतिमत:, मुसळधार पावसामध्ये दृष्यमानता कमी होऊ नये, यासाठी विंडस्क्रीनवर ब्रँडेड रेन रिपेलंटचा वापर करा.

गाडी पाण्यात अडकली तर भांबावून जाऊ नका!

गाडी पाण्यात अडकते तेव्हा सर्वसाधारणपणे वाहनचालक गाडी फिरवण्याचा प्रयत्न करतो. पण ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. त्याऐवजी इंजिन बंद करा. जर फार नुकसान नाही, असे तुम्हाला वाटले तर तसेच बसून राहा. अन्यथा वेळ न दवडता २४ बाय ७ रोड-साइड असिस्टन्सला कॉल करा. आपत्कालीन क्रमांक जवळ बाळगणे नेहमीच उपयुक्त ठरते. हल्लीच बहुसंख्य वाहन कंपन्यांचे स्वतःचे ॲप असतात, जसे निसानचे निसाप कनेक्ट आहे, ज्यावर तुम्ही आपत्कालीन सेवेसाठी नोंदणी करू शकता.

आफ्टर केअर मेंटेनन्स

पावसात गाडी चालवण्याची मजा लुटल्यानंतर आता गाडीच्या देखभालीकडेही (आफ्टर केअर मेंटेनन्स) लक्ष देणे गरजेचे आहे. गाडीला लागलेला सगळा चिखल आणि घाण साफ करण्यासाठी गाडी पूर्णपणे धुवा. गाडीच्या सर्व काचा खाली करून गाडीत हवा खेळती करून अंतर्गत भागात दमटपणा राहून कुबट वास येणार नाही, याची काळजी घ्या आणि फ्लोअर मॅट्स बाहेर काढून सुकवा.

मॉन्सून काळात चांगल्या प्रकारे गाडी चालवण्यासाठी आणि गाडीची चांगली काळजी घेण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. जबाबदारीने आनंद लुटा, गाडीचा किंवा स्वतःचा जीव धोक्यात न घालणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. मजा लुटा आणि सुरक्षितपणे गाडी चालवा!

(लेखक निसान मोटर इंडिया प्रा. लि. मध्ये हेड – विक्रीपश्चात सेवा पदावर कार्यरत आहेत.)