खटक्यावं बोट अन् जाग्यावं पलटी, २४ तासांत १ लाख जणांनी केलंय ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकिंग; आनंद महिंद्रांनीही केलंय कौतुक

बुकिंग सुरू होताच या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी विक्रमी संख्येने बुकिंग झाली. १ लाखापेक्षा जास्त जणांनी बुकिंग केल्याचं समोर आल्यानंतर महिंद्रांनी ट्विटरद्वारे भाविश अग्रवाल यांना टॅग करून कौतुक केलं आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी १५ जुलैपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://olaelectric.com/) ४९९ रुपयांची टोकन रक्कम भरून सुरूवात झाली आहे. ही स्कूटर आज दुपारी २ वाजता भारतात लाँच होणार आहे.

  नवी दिल्ली : आपल्या दणकट गाड्यांसाठी प्रख्यात असलेली कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra & Mahindra ) चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांचे कौतुक केले आहे. दोन दिवसांपूर्वीच ओला इलेक्ट्रिकने आपल्या अधिकृत वेबसाइटवर (https://olaelectric.com/) इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंगला सुरूवात केली.

  बुकिंग सुरू होताच या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी विक्रमी संख्येने बुकिंग झाली. १ लाखापेक्षा जास्त जणांनी बुकिंग केल्याचं समोर आल्यानंतर महिंद्रांनी ट्विटरद्वारे भाविश अग्रवाल यांना टॅग करून कौतुक केलं आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी १५ जुलैपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://olaelectric.com/) ४९९ रुपयांची टोकन रक्कम भरून सुरूवात झाली आहे. ही स्कूटर आज दुपारी २ वाजता भारतात लाँच होणार आहे.

  “ही इलेक्ट्रिक स्कूटर कशी आहे त्याने काहीही फरक पडत नाही….पण धैर्य ठेवणाऱ्याला आणि जोखिम पत्करणाऱ्याला त्याचं फळ मिळताना बघून आनंद होतोय”, असं आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. पुढे आनंद महिंद्रा यांनी भाविश अग्रवाल यांना टॅग करून, “नवीन उद्योजक भाविश अग्रवालचं अनुसरण करतील आणि अपयशी होण्याची भीती बाजूला सारतील व इनोवेशन क्षेत्राला अजून बळकटी मिळेल….”अशा आशयाचं ट्विट महिंद्रांनी केलं आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला २४ तासात १ लाखापेक्षा जास्त बुकिंग मिळाल्यानंतर आनंद महिंद्रांनी ट्विटरद्वारे ही प्रतिक्रिया दिली.

  दरम्यान, १ लाखापेक्षा जास्त बुकिंग मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना भाविश अग्रवाल यांनी ट्विटरद्वारे आभार व्यक्त केले आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीची एक विस्फोटक सुरूवात झाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग करणाऱ्या १ लाखापेक्षा जास्त जणांचा खूप खूप आभारी आहे. अशा आशयाचं ट्विट भाविश अग्रवाल यांनी केलं आहे. आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी भारतातील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद बघून रोमांचित झालोय असं भाविश अग्रवाल यावेळी म्हणाले, तसेच ही फक्त सुरूवात असल्याची प्रतिक्रिया भाविश यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

  १५ जुलैला फक्त ४९९ रुपयांच्या ‘रिफंडेबल’ टोकन रक्कम भरून ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंगला सुरूवात झाली. बुकिंगला सुरूवात झाल्यानंतर ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने काही वेळासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर एरर देखील झळकला होता. त्यानंतर साइट क्रॅशही झाली होती. असं झाल्यानंतर भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवरून ग्राहकांची माफी मागितली. ग्राहकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला…आम्ही यासाठी तयार नव्हतो…त्यामुळे वेबसाइटवर लोड आला होता…स्कूटरच्या बुकिंगसाठी सुरूवातीला ज्यांना समस्येचा सामना करावा लागला त्यांची मी माफी मागतो असं म्हणत त्यांनी वेबसाइट पूर्ववत झाल्याची माहिती दिली. त्यांनतर अवघ्या २४ तासात या स्कूटरसाठी १ लाखापेक्षा जास्त जणांनी बुकिंग केल्याचं समोर आलं होतं.

  ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटमध्ये एथर 450 एक्स या दमदार स्कूटरला टक्कर देईल. याशिवाय, बजाज चेतक आणि टीवीएस आयक्यूब अशा प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्सनाही ओला स्कूटर तगडी टक्कर देणार आहे.

  इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करत आहे. Etergo BV ने यापूर्वीच एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकणारी स्कूटर तयार केली आहे.