टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरची भागीदारी; पुण्यामध्ये ७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा सोलर रुफटॉप एक्सपान्शन प्रोजेक्ट उभारणार

या सौर प्रकल्पासाठी टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांच्या दरम्यान नुकताच एक वीज खरेदी करार करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले, शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल असलेले हे इन्स्टॉलेशनमध्ये एकूण २३ मिलियन युनिट्स वीज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे

  • या विस्तारामुळे टाटा मोटर्स पीव्ही पुणे उत्पादन युनिटमध्ये आता असणार आहे
  • भारतातील सर्वात मोठा, १७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा ऑन-साईट सौर प्रकल्प
  • या प्रकल्पामध्ये २३ मिलियन युनिट्स वीज निर्माण होईल
  • ५.२३ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखले जाईल
  • ८.३६ लाख झाडे लावल्यासारखे आहे

पुणे : उत्पादन प्रक्रिया पर्यावरणपूरक, शाश्वत असावी या टाटा समूहाच्या (Tata Group) वचनबद्धतेला अधोरेखित करत टाटा पॉवर (Tata Power) आणि टाटा मोटर्स (Tata Moters) यांनी पुण्यातील (Pune) चिखलीमधील (Chikhli) टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेहिकल प्लांटमध्ये (Passenger Vehicle Plant) ७ मेगा-वॅट पीक (एमडब्ल्यूपी) क्षमतेचा सोलर रुफटॉप प्रोजेक्ट (Solar Rooftop Project) विकसित करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन विकसित केलेल्या १७ एमडब्ल्यूपी क्षमतेच्या ऑन-साईट सोलर प्रकल्पाचा (Onsite Solar Project) हा तिसरा टप्पा आहे. या प्रकल्पातील १० एमडब्ल्यूपी क्षमता आधीच इन्स्टॉल करण्यात आली आहे. टाटा पॉवरने हे नवे नवीन इन्स्टॉलेशन केल्यावर टाटा मोटर्स (Tata Moters) पीव्ही उत्पादन युनिट हे देशातील सर्वात मोठा ऑन-साईट सौर प्रकल्प असलेले युनिट बनेल.

या सौर प्रकल्पासाठी टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांच्या दरम्यान नुकताच एक वीज खरेदी करार करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असलेले, शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल असलेले हे इन्स्टॉलेशनमध्ये एकूण २३ मिलियन युनिट्स वीज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ५.२३ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाईल. हे म्हणजे संपूर्ण जीवनभरात ८.३६ लाख झाडे लावण्यासारखे आहे.

या प्रकल्पाबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट राजेश खत्री म्हणाले, “शून्य उत्सर्जन उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने टाटा मोटर्स प्रयत्नशील आहे. टाटा पॉवरच्या सहयोगाने आमच्या पुणे प्लांटमध्ये ७ एमडब्ल्यूपी क्षमतेचा अतिरिक्त रूफ टॉप सोलर प्लांट इन्स्टॉल करण्यासाठी हा नवा करार करून आम्ही १००% शुद्ध ऊर्जेच्या आमच्या उद्दिष्टाच्या जवळ जात आहोत. ही क्षमता सुरु झाल्यानंतर आम्ही भारतातील सर्वात मोठे ऑन साईट सोलर इन्स्टॉलेशन असलेली कंपनी बनू.”

आरई १०० वर स्वाक्षऱ्या करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून टाटा मोटर्स त्यांच्या संपूर्ण संचालनामध्ये १००% शुद्ध ऊर्जा वापरण्यासाठी वचनबद्ध असून यासाठी त्यांनी त्यांच्या कामांमध्ये शुद्ध ऊर्जेचे प्रमाण हळूहळू वाढवत अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या कंपनीने ९२.३९ मिलियन केडब्ल्यूएच शुद्ध वीज निर्माण केली, त्यांच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत हे प्रमाण १९.४% आहे. २०३० पर्यंत १००% शुद्ध ऊर्जा वापरण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शुद्ध ऊर्जा मिळवण्यासाठी ही कंपनी अथक प्रयत्नशील आहे.

टाटा पॉवरचे न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे चीफ गुरिंदर सिंग संधू यांनी या प्रकल्प विस्ताराबाबत सांगितले, “टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटमधील भारतातील सर्वात मोठा ऑन-साईट सोलर प्रकल्प म्हणजे आपापल्या व्यवसायांमध्ये पर्यावरणपूरक पावले उचलण्याची आमची वचनबद्धता दृढ असल्याचे दर्शवतो. आपल्या प्रकल्प कार्यान्वयन क्षमता आणि तांत्रिक कौशल्ये यांच्या बळावर आपल्या सहयोग्यांना लक्षणीय मूल्य प्रदान करणारी, भारतातील सर्वात मोठ्या शुद्ध ऊर्जा कंपन्यांपैकी एक हे टाटा पॉवरचे स्थान या प्रकल्पामुळे अधिक मजबूत झाले आहे.”

कितीतरी मोठ्या सौर प्रोजेक्ट्सच्या यशस्वी उभारणीचा अनुभव टाटा पॉवरच्या गाठीशी आहे. एकाच ठिकाणी उभारण्यात आलेले जगातील सर्वात मोठे रुफटॉप – राधास्वामी सत्संग बीस, अमृतसर (१६ मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (२.६७ मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे क्रिकेट स्टेडियम (८२०.८ केडब्ल्यूपी), डेल बंगलोर येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (१२० केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे १.४ मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवरने उभारले आहेत. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर मोठ्या प्रमाणावर करत आहे.