चारचाकी धारक मुंबईकरांना आज शेवटचा निर्वाणीचा इशारा, उद्यापासून सीटबेल्ट नसेल तर असा बसेल फटका की…

Mumbai Seat Belt News : अनेक वाहनचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसविले नसून मंगळवारपासून सुरु होणाऱ्या दंडात्मक कारवाई दरम्यान प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सहप्रवाशाला केलेल्या हेल्मेटसक्तीप्रमाणे ही सक्तीदेखील बारगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    मुंबई : मुंबईत (Mumbai) चारचाकी वाहनातून (Four Wheeler) प्रवास करणारे चालक (Drivers) आणि मागील सीटवर बसणारे प्रवासी यांना उद्या (मंगळवार) १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट (SeatBelt) बंधनकारक (Compulsion) करण्यात आला आहे. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी (Mumbai Traffic Police) दिलेली १५ दिवसांची मुदत आज (सोमवारी) संपत आहे. अनेक वाहनचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसविले नसून मंगळवारपासून सुरु होणाऱ्या दंडात्मक कारवाई (Panelty Action) दरम्यान प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सहप्रवाशाला केलेल्या हेल्मेटसक्तीप्रमाणे (Helmet Compulsion) ही सक्तीदेखील बारगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे नुकतेच कार अपघातात निधन झाले. तेव्हापासून देशभर रस्ते सुरक्षा आणि सुरक्षित प्रवासाबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना उशिरा का होईना शहाणपण सुचलं आणि चर्चा सुरु झाली.

    देशभरातील अनेक राज्यांमध्ये रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी १४ ऑक्टोबरला जाहीर केले आहे. मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे.

    त्यामुळे सहप्रवाशांना सीटबेल्टची सुविधा नसल्यास वाहनचालकांनी सोमवारी ३१ ऑक्टोबरपर्यंत सीटबेल्ट बसवून घ्यावेत. १ नोव्हेंबरपासून सहप्रवासी विना सीटबेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते.

    वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत (आज) ३१ ऑक्टोबरला संपत असल्याने मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

    ओला, उबर यांसारख्या ॲपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये हे बेल्ट बसविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ही सक्ती आम्हाला नसल्याचे टॅक्सीचालक म्हणत असले तरी कारवाई सरसकट सर्वांवर केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. याच कारणामुळे मंगळवारपासून ज्यावेळी अंमलबजावणी सुरु होईल, त्यावेळी पोलिस आणि चालकांमध्ये खटके उडण्याची किंवा वादावादी होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

    सक्ती महामार्गावर असावी

    वाहतुकीचे नियम हे आपल्याच सुरक्षेसाठी आहेत हे मान्य असले तरी मुंबईत वाहनांचा वेग फार कमी असतो. त्याऐवजी महामार्गावर ज्या ठिकाणी वाहने वेगात असतात तेथे सर्व प्रवाशांना सीटबेल्टसक्ती असावी, असे मुंबईकरांचे मत आहे.

    अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, जागोजागी सिग्नल यामुळे मुंबईत मुळातच वाहनांचा वेग कमी असल्याने अपघात झालाच तरी यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता कमी असते, असेही काहींनी म्हटले आहे.

    मुंबईकरांना सीटबेल्ट बाबत असलेले प्रश्न

    • शहरात वाहनांचा वेग कमी असताना सीटबेल्टसक्ती कशासाठी?
    • ‘वॅगन आर’सारख्या पाच आसनी छोट्या कारमध्ये तीन प्रवाशांनी सीटबेल्ट कसा लावायचा?
    • वाहतुकीच्या सर्व नियमांची सक्ती मुंबईतच का?
    • शेअर टॅक्सींना ही सक्ती लागू असणार का?
    • रिक्षातही प्रवासी वाहतूक केली जाते मग त्यांच्या सुरक्षेचे काय?
    • कमी वेगामुळे सहप्रवाशाच्या हेल्मेटसक्तीबाबतची पोलिसांची तत्परता आता कमी झाली, मग सीटबेल्टसक्ती का?
    • शाळेच्या बस, खासगी तसेच सरकारी बस यांना हा नियम लागू असेल का?