परळी मतदारसंघातील २१ कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी १० हजारांची मदत; धनंजय मुंडेंनी सेवाधर्माच्या माध्यमातून साधले कन्यादान

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात सुरू असलेल्या सेवाधर्म या कोविड काळातील सामाजिक उपक्रमांतर्गत परळीतील विविध भागाती २१ कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी प्रदान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ७५ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.

    परळी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात सुरू असलेल्या सेवाधर्म या कोविड काळातील सामाजिक उपक्रमांतर्गत परळीतील विविध भागाती २१ कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी प्रदान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ७५ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.

    दरम्यान विवाहीतांना सहाय्य निधी देण्यात येणारी कुटुंबे ही सर्वसाधारण परिवार आहेत. ज्या परिवारातील लग्न मंदिर मज्जीद बौद्धविहारात संपन्न होतात; मंगल कार्यालयात नाही. लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या आपल्या बंधू-भगिनींना आपल्या मुलीचे कन्यादान करणे हे एक मोठे आव्हान झाले होते. दरवर्षी आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह आयोजित करून गरीब व गरजू कुटुंबातील विवाहास सहाय्य करीत असतो, मात्र कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीत टाळेबंदीमुळे हा सोहळा घेता आला नाही. तेंव्हा सेवाधर्म या लोकोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना बाधित झालेल्या गरजू कुटुंबातील विवाहासाठी अर्थसहाय्य निधी देऊन मी माझ्या मतदारसंघातील लोकांप्रति माझे कर्तव्य निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

    विवाहीतांना सहाय्य निधी कुटुंबियांना वितरित करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वधू मातापिता व कुटुंबातील सदस्यांसोबत व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला व लग्नसोहळ्यास व नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. मुंडेंचे आभार मानताना काही कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. प्रतिकूल परिस्थितीत एकीकडे कोरोनाची झालेली किंवा होऊन गेलेली बाधा, त्यात घरातील लग्नाचा खर्च या परिस्थितीत धनु भाऊंच्या या अर्थसहाय्यमुळे कुटुंबातील लग्नास मोठे सहकार्य होत आहे, अशा भावना परळीकर व्यक्त करताना दिसत आहेत. आजतागायत ७५ कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी १० हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड स्वतः सेवाधर्म या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमास मार्गदर्शन करीत आहेत.

    यावेळी न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड, रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रा.कॉ. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, नगरसेवक जाबेर खान पठाण, नितीन रोडे, बाबासाहेब बळवंत, अझीझ कच्छी, सरचिटणीस अनंत इंगळे, विजयकुमार गंडले, सुभाष वाघमारे, रवी मुळे, प्रा.शाम दासूद, विजय हजारे, धम्मा अवचारे, गिरीष भोसले, सचिन मराठे, पप्पू काळे यांसह आदी उपस्थित होते.