आष्टी तालुक्यात 100 गायी – वासरांचा मृत्यू; घटसर्प आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

गाय व वासरे मृत्यूमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प आजाराने या जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

    बीड : आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये मागील चार ते पाच दिवसांमध्ये 60 संकरित गाई आणि 40 वासरांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाय व वासरे मृत्यूमुखी पडल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांचे सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मृत गायींचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घटसर्प आजाराने या जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन, संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.

    दरम्यान या आजारामध्ये सुरुवातीला गायीला तीन दिवस लाळ्या खुरकुत आजारा प्रमाणेच ताप येतो, ताप आल्यानंतर चौथ्या, पाचव्या दिवशी श्वसनाचा त्रास होऊन जनावर दगावते. आष्टी तालुक्यातील तवलवाडी हे गाव दूध उत्पादनात अग्रेसर गाव आहे. गाव जरी लहान असले तरीही या ठिकाणी जवळपास पाच हजार लिटर दैनंदिन दूध संकलन केले जाते. या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला आहे. मात्र घटसर्प आजारामुळे 100 जनावरे दगावल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. गावावर शोककळा पसरली आहे.

    या घटनेने पशुवैद्यकीय विभागामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तवलवाडी गावामध्ये संभाजीनगर येथील विभागीय पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रोहित धुमाळ, डॉक्टर वानखेडे यांच्या टीमने भेट दिली असून पाहणी केली आहे. तसेच आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मंगेश ढेरे यांची टीम दोन दिवसांपासून तवलवाडी गावामध्येच तळ ठोकून आहेत.

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कायमच पर्जन्यमान कमी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय निवडला आहे. तो अगदी प्रामाणिकपणे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केला जातो. आपल्या लेकरांची जशी काळजी घेतात अगदी तशी किंबहुना जास्त काळजी शेतकरी या गायींची घेत असतात. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र ही याच गायी – म्हशींवर अवलंबून आहे. या रोगाचा प्रादुर्भाव तत्काळ आटोक्यात आणला जायला हवा. नाहीतर अगोदरच दुधाचे कमी झालेले भाव, कोरोनाचा प्रादुर्भाव याने अक्षरशः मेटाकुटीला आलेले शेतकरी आपल्या पशुधनाच्या काळजीने आणखीनच भयभीत झाले आहेत.