बीड जिल्ह्यात लपवले तब्बल १०५ कोरोना बळी…

अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड झाले आहे. बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर, आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद आहे. यावरून १०५ कोरोना बळींचा आकडा लपविल्याचे सिद्ध होत आहे.

    बीड : जिल्ह्यात काेरोनाच्या वाढत्या रुग्णांसह मृत्यूही होत आहेत. ते रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासनाला अपयश येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड झाले आहे. बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३७८ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर, आरोग्य विभागात याच महिन्यात २७३ मृत्यूंची नोंद आहे. यावरून १०५ कोरोना बळींचा आकडा लपविल्याचे सिद्ध होत आहे.

    कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते. पण ती होत नसल्याचे दिसते. खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

    एप्रिल महिन्यात बीडमधील भगवानबाबा स्मशानभूमीत ११४ तर अंबाजोगाईतील स्मशानभूमीत २६४ बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नगरपालिकेत आहे. तर, दुसऱ्या बाजूला याच महिन्यात आरोग्य विभागाकडे २७३ मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे १०५ मृत्यू लपविल्याचे उघड होत आहे.