पंकजा मुंडेच्या कारखान्याच्या उपाध्यक्षांसह ५ संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडे बंधु भगिनींत नवा राजकीय संघर्ष

धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, २०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले.

    बीड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या मराठवाड्यात संवाद यात्रेवर आहेत.  बीड मध्ये त्यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या प्रवेशामुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांपूर्वीच मुंडे बंधु- भगिनींमधील राजकीय स्पर्धा नव्याने समोर येण्याची चिन्हे आहेत.

    प्रवेशामुळे संघटनेला बळ मिळणार

    या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत,’ अशी प्रतिक्रिया या प्रवेश सोहळ्यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, २०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले.

    महागाईने सामान्य लोकांना वेठीस धरले

    यावेळी भाजपवर टीका करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपच्या पोटात दुखते. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आलिशान घर बांधले जात आहे, याची देशाला गरज आहे का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की बीड मध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संघटनेचे काम चांगले केले आहे त्यांना मी शंभर गुणे देत आहे. पाटील म्हणाले की, या मतदार संघात पुढच्या दहा निवडणुका धनंजय मुंडे यांना जिंकता येतील अश्या प्रकारची संघटना बांधण्यात आली आहे.

    शासनाची नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था

    दरम्यान, मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडत असल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासन नुकसान भरपाई देण्याची सगळी व्यवस्था करेल, अशा शब्दात जयंत पाटील यांनी परळी येथे बोलताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील यानी आज काही भागात दौरा करत पूरस्थितीचा आणि शेती नुकसानीचा अंदाज घेतला आहे.