मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा, ५ जूनला पहिला मोर्चा बीड येथे निघणारच : विनायक मेटे

आज बीड शहरात शासकीय विश्राम गृह या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकी संदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

  बीड : ‘मराठा आरक्षण (Maratha reservation) संदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच’, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये (Beed) मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती.

  सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

  आज बीड शहरात शासकीय विश्राम गृह या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकी संदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘५ जूनला सकाळी १०: ३० वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच’ असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोर्चाचे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.

  मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी ९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे म्हणाले.

  ‘सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे तसंच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत निकराचा लढा सुरूच राहील’ असं देखील विनायक मेटे म्हणाले.

  Aggressive holy of Maratha community first march will start on 5th June at Beed says Vinayak Mete