बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

गेल्या 14 महिन्यांपासून अतिक्रमण काढा ही मागणी घेऊन, शासन दरबारी खेटे मारणाऱ्या तरुणाने, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.

    बीड : गेल्या 14 महिन्यांपासून अतिक्रमण काढा ही मागणी घेऊन, शासन दरबारी खेटे मारणाऱ्या तरुणाने, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. विलास कैलास मादंड रा. तालखेड ता. माजलगाव असं त्या तरुणाचं नाव आहे..

    बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या तालखेड गावांमध्ये, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील यांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी विलास मानदंड हे गेल्या 14 महिन्यांपासून करत आहेत. यासाठी त्यांनी ग्रामसेवकांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यासाठी उपोषण आंदोलन देखील केला आहे मात्र याची दखल ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी यांनी कोणीच घेतली नाही म्हणून संतप्त झालेल्या विलास मानदंड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान शासन निर्णयानुसार अतिक्रमण केलेल्या, ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे, त्याचबरोबर सरपंच ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील त्यांनी केलीय.तर गावातील अतिक्रमणाबाबत लढा देत असल्याने, गावासह इतर ठिकाणच्या राजकीय व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात आहेत. असा आरोप देखील यावेळी विलास मानदंड यांनी केला आहे.