‘त्या’ टूलकिटची गंगोत्री बीडमध्ये? शंतनू मुळूकविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, मुलगा निर्दोष असल्याचा आईवडिलांचा दावा

या टूलकिटचे धागेदोरे सध्या महाराष्ट्रातील बीडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. बीडच्या शंतनू शिवलाल मुळूक या मराठी तरूणाचाही टूलकिट बनवण्यात सहभाग होता, असा पोलिसांना संशय आहे. एकूण तिघांनी हे टूलकिट तयार केले. त्यामध्ये दिशा रवी, निकीता जेकब आणि शंतनू शिवलाल मुळूक याची नावं समोर आली आहेत. या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे

    केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातल स्विडीश सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या ट्विटनंतर देशभरात खळबळ उडाली होती. तिनं केलेल्या ट्विटमध्ये एका टूलकिटचा समावेश होता. हे टूलकिट करण्यात कुणाकुणाचा हात होता, याचा सध्या पोलीस शोध घेतायत.

    या टूलकिटचे धागेदोरे सध्या महाराष्ट्रातील बीडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. बीडच्या शंतनू शिवलाल मुळूक या मराठी तरूणाचाही टूलकिट बनवण्यात सहभाग होता, असा पोलिसांना संशय आहे. एकूण तिघांनी हे टूलकिट तयार केले. त्यामध्ये दिशा रवी, निकीता जेकब आणि शंतनू शिवलाल मुळूक याची नावं समोर आली आहेत. या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

    शंतनू हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो फरार आहे. औरंगाबाद खंडपीठात त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जदेखील केल्याची माहिती मिळतेय. शंतनूचा शोध घेत बीडला पोहोचलेल्या पोलिसांनी त्याच्या वडिलांची तीन तास चौकशी केली. त्यानंतर शंतनूचे वडिल शिवलाल यांना सोबत घेऊन पोलीस त्यांच्या औरंगाबादच्या घरी गेले. तिथेदेखील त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना पुन्हा बीडला सोडण्यात आले.

    दरम्यान, आपल्या मुलाचा याच्याशी काहीही संबंध नसून नाहक त्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा शंतनूच्या कुटुंबीयांनी केलाय. शंतनूच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. त्याला न्यायालयातून जामीन मंजूर होतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.