बीड जिल्हा रुग्णालयास 30 बायपॅप मशिन्स, आणि 29 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

    बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी सकाळीच बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील निकड पाहत त्यांनी लागलीच 30 बायपॅप मशिन्स आणि 29 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिले आहेत.

    थेट फुफ्फुसावर मारा झाल्याने श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णास श्वसनासाठी संजीवनी ठरणारे बायपॅप मशिन्स व हवेतून ऑक्सिजन वेगळा करून शुद्ध ऑक्सिजन देण्याची क्षमता असलेले कॉन्संट्रेटर्स हे या कठीण काळात कोरोना बाधित रुग्णांना संजीवनीचे काम करत आहेत.

    दरम्यान धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा समग्र आढावा घेऊन रुग्णसंख्या कमी करणे तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या होत्या. शासन प्रशासनाच्या मदतीला भक्कमपणे उभे असून, आवश्यक ती प्रत्येक सामग्री पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने केलेल्या मागणीनुसार ना. मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयास 30 बायपॅप मशिन्स व 29 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून दिले असून ते जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी दिली आहे.