नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा; खा. प्रितम मुंडे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

खरिपातील पिकांना बहर आलेला असतानाच अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    बीड : खरिपातील पिकांना बहर आलेला असतानाच अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    पेरणीपूर्वी आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते,यंदा पावसाने दिलेल्या साथीमुळे चांगले पीक येण्याची चिन्हे असतानाच अवेळी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली.जिल्ह्याच्या बहुतांश भागात पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सतत अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या चिंतेकडे वेधले.नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

    शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या सूचना करताना खा.प्रितम मुंडे यांनी गतवर्षीच्या खरीप पीक विम्याचा मुद्दा देखील प्राधान्याने मांडला.गतवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते.तेंव्हा अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही.याबाबत शासनस्तरावर योग्य कार्यवाही आणि पाठपुरावा करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून द्यावी व याबाबतच कार्यवाही अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

    महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीतील अनियमिततेची चौकशी करा

    बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ०६ ऑगस्ट २०२१ च्या आदेशानुसार आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीप्रमाणे झाल्या नाहीत,यात मोठी अनियमितता झाली असून याबाबत तक्रारी देखील होत आहेत.जिल्ह्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करावी व यासंदर्भात अवगत करावे अशा सूचना खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.