कोरोना संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रभर दौरा करणार; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंचा एल्गार

मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावात पोहचणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाची स्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.

    परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांची व्रजमुठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावात पोहचणार असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाची स्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंकजा मुंडेनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

    लोकं म्हणतात तुमचा पराभव झाला,पराभव हा माणसाचा अल्पविराम आहे,पूर्णविराम नाही.लोकांच्या मनातील आशा संपून जातील तो खरा पराभव आहे. आमचा निवडणुकीत पराभव झाला असेल पण लोकांच्या मनातील आशा अजून मावळल्या नाहीत. ह्याच आशा माझं ऑक्सिजन रेमडिसीवर आणि व्हेन्टिलेटर आहेत आमचं ठरलंच आहे,आम्हाला एकदा शिवाजी पार्क हे मैदान भरवायचे आहे. हे कोणत्या निवडणुकीसाठी नाही तर वंचित आणि बहुजन तरूणांना दाखवलेल्या स्वप्नांसाठी भरवायचे आहे असं त्या म्हणाल्या.

    ..तर आज दारोदार फिरण्याची वेळ आली नसती

    “गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती,”आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. ही नवी पीढी आहे. यांना खोटं सांगू नका, खरं सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.