रागाचा पारा चढला अन्… धनंजय मुंडेंनी भर बैठकीतून अधिकाऱ्याला बाहेर हाकलून दिले

बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुंडेच्या रागाचा पारा चढला अन् त्यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून बाहेर हाकलून दिले. या बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

बीड : बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुंडेच्या रागाचा पारा चढला अन् त्यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून बाहेर हाकलून दिले. या बैठकीला सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

उत्कर्ष गुट्टे हे बीड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मागच्या नियोजन समितीच्या बैठकीत गुट्टे यांना नगरपालिकेतील कामकाजाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश नियोजन समितीने दिले होते. याबाबत नियोजन समितीच्या बैठकीत मुख्याधिकारी गुट्टे यांना अहवालाविषयी विचारणा केली असता कामाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची खोटी माहिती त्यांनी दिली.

कसलाच अहवाल प्राप्त झाला नसल्याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला. यामुळे गुट्टे यांचा खोटारडेपणा उघड झाला. या प्रकारामुळे नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच भडकले. गुट्टे यांच्या कामाचा पाढा इतर सदस्यांनी देखील वाचून दाखविला.

इथं कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे खडेबोल धनंजय मुंडे यांनी सुनवले. तसेच गुट्टे यांना भर बैठकीतून अक्षरशः हाकलून दिले. त्यानंतर गुट्टे यांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी एकमुखी ठराव देखील पारित करण्यात आला.