चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं ; संभाजीराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी दिली प्रतिक्रिया…

सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले.

    बीड :  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  मला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असा जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना म्हणाले होते. लागलीच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली होती. पण तरिदेखील त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. परंतु आता संभाजीराजे छत्रपती यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले.

    मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे कोर्टात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार उगीच वायफळ चर्चेला अर्थ नाही, असा टोला देखील धनंजय मुंडेंनी विरोधकांना लगावला आहे.