खा. प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली सुरु…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात ईसकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्यातून डॉ. प्रीतम मुंडे यांचंही नाव आघाडीवर आहे.

  प्रीतम मुंडेच्या कामाची दखल

  डॉ. प्रीतम मुंडे या सध्या बीडच्या खासदार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्या आहेत. तसंच पंकजाताई मुंडे यांच्या लहान बहिण आहेत. प्रीतमताईंनी यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाला. तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकानं पराभव केला होता. प्रीतमताईंच्या कामाची दखल घेऊन त्याच्यावर मंत्रिमंडळात नवी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

  ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मंत्रीपद

  दरम्यान खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजप लवकरच मोठं गिफ्ट देणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारच्या सत्ताधारी यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सिंधिया यांना मंत्रीपद देणं जवळपास निश्चित झालं आहे. सिंधिया यांचे समर्थक असलेल्या एका नेत्यानं सांगितले की, सिंधिया यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. तसंच नगरविकास किंवा मनुष्यबळ यासारखी महत्त्वाची मंत्रालये देण्याचीही चर्चा आहे. सिंधिया यांना भाजपमध्ये येऊन 15 महिने झालेत. आता त्यांना दिलेलं आश्वासन भाजप पूर्ण करणार आहे.