‘ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नाही त्यांना देखील नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील’ धनंजय मुंडे

बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरलेला नाही, मात्र त्यांना देखील नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतीपिकांसह जमिनी, घरे व इतर नुकसानीची विम्यासह विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

    बीड – अतिवृष्टी आणि पूराच्या या अभूतपूर्व परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी पीक विम्यासोबतच एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत मिळावी याबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेचा सोमवारी जिल्हास्तरावर सर्व विभागांकडून मंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला.

    यावेळी पीक नुकसानीचे अर्ज विमा कंपनीकडे ऑनलाइनसह ऑफलाईन पद्धतीने देखील स्वीकारणे सुरू झाले आहेत. विमा कंपनीचे एजंट किंवा अन्य कोणाचेही शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे कोणतेही गैरप्रकार आढळल्यास त्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.

    जिल्ह्यात सर्वत्र कोकणासारखी स्थिती आहे, त्यात पुन्हा पुन्हा पाऊस पडतो आहे. शेतात पाणी साचलेले, विजेचे खांब कोसळलेले, जमिनी खरडून वाहून गेलेल्या, रस्ते-पूल नाहीसे झाले तर कुठे वीज पुरवठा खंडित झालाय; या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व यंत्रणा वेगाने कार्यान्वित केल्या आहेत.

    जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण यांसह संबंधित विभागांनी या नुकसानीची दुरुस्ती करून पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी ज्या यंत्रणेतील निधी वापरता येईल तो वापरावा, अधिकचे मनुष्यबळ उभारावे, कागदोपत्री प्रक्रियेत वेळ घालू नये व तातडीने कामे सुरू करावीत अशा सूचना देखील धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

    बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरलेला नाही, मात्र त्यांना देखील नुकसानभरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतीपिकांसह जमिनी, घरे व इतर नुकसानीची विम्यासह विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.