बीडमध्ये रेशनचा काळा बाजार करणारी टोळी गावकऱ्यांनी पकडली

कोरोना काळात अगोदरच लॉकडाऊन मुळे हातचा रोजगार गेल्यामुळे, आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य लवकर मिळत नाही. दुसरीकडे रेशन धान्य दुकानदार काळ्या बाजारात धान्य विक्रीला घेऊन जात असताना, गावकऱ्यांनी मध्य रात्री 1 वाजता पकडल्याने खळबळ उडाली आहे.

  बीड : कोरोना काळात अगोदरच लॉकडाऊन मुळे हातचा रोजगार गेल्यामुळे, आर्थिक अडचणीत असलेल्या सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य लवकर मिळत नाही. दुसरीकडे रेशन धान्य दुकानदार काळ्या बाजारात धान्य विक्रीला घेऊन जात असताना, गावकऱ्यांनी मध्य रात्री 1 वाजता पकडल्याने खळबळ उडाली आहे.

  यामुळे बीड जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.बीड तालुक्यातील तांदळवाडी गावात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नसताना, रेशन माफिया काळ्या बाजारात धान्य विकत असल्याच्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गावकर्‍यानी रेशन माफियांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले असून या प्रकरणात गावकरी आक्रमक झाले असून कारवाईची मागणी करत आहेत.

  बीड तालुक्यातील 1200 लोकवस्तीच्या तांदळवाडी गावात, लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यापासून रेशनचे धान्य मिळत नसल्याचे, गावकरी सांगत आहेत. याच गावातील रेशन धान्य दुकानदार रात्री 1 च्या दरम्यान गावातील रेशनचे धान्य परस्पर विक्री करून टेम्पो ने घेऊन जात असताना. सुरुवातीला चोर आहेत म्हणून गावकऱ्यांनी गाडी अडवली. गाडीसह रेशन माफियांना पकडले, त्याना चोप दिला, नंतर पोलिसांना फोन करून पोलिसांच्या हवाली केले. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात रेशन माफियावर गुन्हा दाखल झाला नसल्याने, गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं रेशन दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यासह, दुकानदारावर कारवाई केली जावी. अशी मागणी गावकरी करत आहेत.

  तांदळवाडी गावांमधील राशन दुकानदार, राजेंद्र शाहूराव सिरसट यांचा मृत्यू झाल्यामुळे, राशन दुकानाची पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी घाट येथे जोडण्यात आले आहे. मात्र खडकी येथील दुकानदार आशिष बालासाहेब भोसले यांनी, तांदळवाडी गावच्या दुकानातील पूर्ण कोटा रेशन माफियाला विकला. तो घेऊन जाताना दुकानाच्या शेजारचे काही माणसं उठले असता, ते निदर्शनास आल्याने हा प्रकार लक्षात आला. गावकऱ्यांनी गाडी चालवत असताना रेशन माफियांनी लोकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी काच फोडली.यावेळी काहीजण पळून गेले तर चार जणांना पोलिसांच्या हवाली केले आहेत. असे गावातील सरपंच पोपट विनायक काळे यांनी सांगितलं

  गोरगरिबांचा तोंडचा घास काळ्या बाजारात विकणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई करावी. अशी मागणी गावकरी करत आहेत. तसेच दुकान निलंबित करून दुसऱ्याकडे द्यावे, 6 महिन्यापासून रेशन वाटप केले नाही. यासंदर्भात वारंवार तक्रार देऊनही रेशन दुकानदाराने ऐकले नाही. असे गावातील महादेव खोसे यांनी सांगितले

  बीड जिल्ह्यातील अनेक गावांत रेशन दुकानदार हे रेशन न वाटता काळ्याबाजारात विक्रीला घेऊन जातात. त्यांना काही अधिकारी आणि राजकीय पुढारी पाठीशी घालत आहेत. त्यामुळे सामान्य गोरगरीबाचा तोंडात घास मिळत नाही. यांच्यावर कडक कारवाई व्हावी. अशी मागणी बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.

  मागच्या पाच सहा महिन्यापासून रेशन मिळत नाही. त्यामुळे रोजंदारीला जाणार्‍या महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत असून हे मिळणारे तांदूळ आणि गहू आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे मिळत आहेत. तसेच रेशन दुकानदाराकडे विचारण्यासाठी केला असता शिवीगाळ आणि अरे-तुरेच भाषा बोलतो, असे गावातील महिलांनी सांगितले. त्यामुळे या दुकानदारावर कारवाई करून आम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन मिळावं. अशी मागणी महिलांनी केली आहे.

  दरम्यान कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारसह राज्य शासनाकडून सामान्य नागरिकांना मोफत व माफक दरात धान्य मिळावे, यासाठी मोठा साठा पाठवण्यात आला होता. यापैकी थेट गोदामातून तर, काही माल रेशन चालकांकडून विक्री केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्यांना कमी दरात व मोफत धान्य मिळत आहे ते देखील धान्य 10 ते 12 रुपये किलोने रुपये भुसार बाजारात विक्री करत असल्याचे समोर आले आहे. घडलेल्या प्रकारामुळे बीड जिल्ह्याच्या एकूणच पुरवठा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यासंदर्भात बीडचे तहसीलदारांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.