शिवसेना पदाधिकारी पैसे कमवण्याच्या नादात, मंत्री संदीपान भुमरेंसमोरच भांडाफोड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने केली. परंतु, आंदोलनामध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व अप्पासाहेब जाधव यांचा सहभाग नव्हता. नेमका हाच मुद्दा उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी संदीपान भुमरे यांच्यासमोर उपस्थित केला. पण, याच वेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा भांडाफोडही केला.

    बीड : आपले दैवत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणी बोलले तर आम्ही सहन करणार नाहीत. आम्ही तीव्र आंदोलन करु, मात्र सर्व आघाड्यांच्या जिल्हाप्रमुखांना सोबत पाठवा. कारण, ते फक्त पैसे कमवण्याच्या नादात आहेत. सगळ्यांचे आपापले धंदे सुरु आहेत. नारायण राणेंविरुद्धच्या आंदोलनाला दोन्ही जिल्हाप्रमुख नव्हते, अशी खदखद शिवसेनेचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर उघड झाली. भुमरे यांच्या उपस्थितीत शनिवारी आगामी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली. मात्र, बैठकीत काही शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांचे धंदेच समोर आणले.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने केली. परंतु, आंदोलनामध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व अप्पासाहेब जाधव यांचा सहभाग नव्हता. नेमका हाच मुद्दा उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी संदीपान भुमरे यांच्यासमोर उपस्थित केला. पण, याच वेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा भांडाफोडही केला. आपले दैवत उद्धव ठाकरेंविरुद्ध एकाने पोस्ट टाकली तर आम्ही घरात घुसण्याच्या तयारीत होतो. आताही जायला तयार आहेत. पण, फक्त सर्व आघाड्यांच्या जिल्हाप्रमुखांना आमच्यासोबत पाठवा, कारण ते कुठेच नसतात. ते फक्त पैसे कमवण्याच्या नादात आहेत, त्यांचे धंदे आहेत, असेही वरेकर म्हणाले.

    आष्टी तालुकाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनीही आमच्या आष्टी – पाटोद्यात शिवसेनेचा संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा प्रमुख केवळ आम्ही बोलविले तर येतात. मात्र, त्यांनी स्वत:हून यावे असे सांगितले. उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी हद्दपारी झाली असल्याची खदखद व्यक्त केली.