आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, ५ जूनला भव्य मोर्चा तर ६ जूनला रायगडावरून होणार घोषणा…

बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर राज्यात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी सरकारला अल्टीमेटम देण्याची वेळ संपली आहे, असे मेटे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात रोष आहे तो उद्या रस्त्यावर पाहायला मिळेल, असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

  बीड : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना माहिती  देतानाच सरकारला दिलेल्या अल्टीमेटमची वेळ संपल्याचा इशारा दिला आहे. ५ जून पासून राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरूवात होणार आहे.

  अल्टीमेटम देण्याची वेळ संपली

  विनायक मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर राज्यात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी सरकारला अल्टीमेटम देण्याची वेळ संपली आहे, असे मेटे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात रोष आहे तो उद्या रस्त्यावर पाहायला मिळेल, असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

  महामारीच्या आरोग्यविषयक नियमांचे पालन

  मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही धक्का न देता उद्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

  ६ जूनच्या रायगडावरील घोषणेकडे लक्ष

  दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खा संभाजीराजे भोसले यांनी सहा जूनपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी ५ व ६ जून रोजी हा सोहळा रायगडावर थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही सरकारने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी घरातच राहून शिवराज्याभिषेक साजरा करावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. आहे.