मराठा आरक्षण मोर्चा; विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन वादाची शक्यता…

कोरोनाच संकट अद्यापही टळलं नाही. त्यात विनायक मेटे हे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून मोर्चा न काढण्यासाठी विनंती केली जात आहे. यामुळे या मोर्चा वरून आमदार विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

    बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 जून रोजी बीड शहरात, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटना मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे 5 जून रोजी न काढता पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जगताप यांनी माहिती दिली आहे.

    तर दुसरीकडे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की , मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना आडवून ठेऊ नये. अन्यथा ज्या ठिकाणी पोलीस मराठा समाज बांधवांना अडवतील त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.

    दरम्यान मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे व भाजपाचे नेते नरेंद्र पाटील हे एकत्रित बीडमध्ये 5 जुनला मोर्चा काढत आहेत. यावरून बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी मोर्चाचे आयोजक यांच्याशी बोलणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की , सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे 5 जून रोजी काढण्यात येणारा मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा पुढे ढकलावा व कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मोर्चा काढावा.

    तसेचं जिल्ह्यामधील कोरोनाच संकट अद्यापही टळलं नाही. त्यात विनायक मेटे हे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून मोर्चा न काढण्यासाठी विनंती केली जात आहे. यामुळे या मोर्चा वरून आमदार विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे.