मराठा आरक्षणासाठी मोर्चा : विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह हजारो मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल…

कोरोनाचे संकट असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या मोर्चा परवानगी नाकारली होती. तरी देखील हजारोंच्या संख्येत हा मोर्चा निघाला. विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांनी सभा घेऊन भाषणेही केली. या प्रकरणी आता पोलिसांनी विनायक मेटे, नरेंद्र पाटील व अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    बीड : मराठा आरक्षणासाठी शनिवारी बीड येथे शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनाचे संकट असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या मोर्चा परवानगी नाकारली होती. तरी देखील हजारोंच्या संख्येत हा मोर्चा निघाला. विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांनी सभा घेऊन भाषणेही केली. या प्रकरणी आता पोलिसांनी विनायक मेटे, नरेंद्र पाटील व अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    दरम्यान ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात वातावरण तापले होते.शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण व राज्याचे मुख्य सचिव यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण न मिळण्यास ते जबाबदार असल्याचे म्हटले होते.

    एवढेच नाही तर अशोक चव्हाण यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील मेटे यांनी सातत्याने लावून धरली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मेटे यांनी ५ जून रोजी बीड येथून पहिला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानूसार काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईहून माज आमदार नरेंद्र पाटील देखील आले होते.

    बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्गांचे प्रमाण व मृत्यूदर पाहता येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी जमवून, राजकीय किंवा सामाजिक आंदोलन, मोर्चा काढण्यास परवानगी नाही. मराठा आरक्षणच्या मागणीसाठीच्या मोर्चाला देखील पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र परवानगी नसतांना मेटे यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा मोर्चा निघाला आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या प्रकरणी पोलिसांनी मेटे, पाटील व हजारो मोर्चेकऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.