बीडमध्ये मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, 23 मोटारसायकल चोरट्यांकडून केल्या जप्त

    बीड : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. अनेक वेळा या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या मात्र चोरटे हाताला लागले नव्हते. दोन दुचाकी चोर बीड मध्ये आल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचे मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान त्यांची कसून चौकशी करताच चोरट्यानी आतापर्यंत 30 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ठाणे , कल्याण, अहमदनगर, परभणी, उस्मानाबाद यासह अनेक जिल्ह्यात या चोरट्यानी हात साफ केलाय. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर या आधीसुद्धा अनेक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शेख इकबाल आणि अजित राठोड असे आरोपीचे नाव असून दोघेही बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी आहेत.