खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन सुरुवात, पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्याचं लक्ष

भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केली.

    बीड : भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केली.

    दरम्यान यावेळी त्या म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे. एक वर्ष मेळाव्याला खंड पडला मात्र आता या एक वर्षाच्या खंडानंतर ही रॅली निघत आहे. यावेळी लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. मात्र हा उत्साह दाखवताना लोकांनी आपापली काळजी घ्यावी. दरम्यान पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या मेळाव्यातून जसा संकेत देतील तसा आमचा संकल्प असेल. अशी प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

    पंकजा मुंडें काय बोलणार?

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांचा काय संकेत देणार ? आणि या संकेताला अनुसरून प्रीतम मुंडे काय संकल्प करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.