मुंडे समर्थकांचे राजीनामे; प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने नाराज

मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. आता मुंडे भगिनींनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली. हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

    बीड :  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रतीम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून बीडमधील 14 भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी जाहीर पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहे.

    … तर वेगळा निर्णय घ्यावा

    भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते.

    परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. आता मुंडे भगिनींनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला होता. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली. हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

    मात्र, आता काही स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा हा प्रकार आहे. यामुळे भाजपाचेच नुकसान होणार आहे, असा इशारा मुंडे समर्थकांकडून भाजपाला दिला जात आहे.